नवी मुंबई स्वच्छतेत देशात अव्वल, पण मुंबई APMC कचऱ्याच्या विळख्यात!
सचिव डॉ राजाराम धोंडकर यांचा पाहणी दौऱ्यात स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची पोलखोल.
नवी मुंबई: स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने देशात अव्वल स्थान पटकावत स्वच्छतेचा बहुमान मिळवला आहे. मात्र, याच नवी मुंबईतील राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार   मुंबई APMC   पाचही बाजारपेठांमधील अस्वच्छतेचे चित्र प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. एकीकडे नवी मुंबई स्वच्छतेचा देशात डंका वाजवत असताना दुसरीकडे मुंबई APMC मध्ये मात्र कचऱ्याचे ढीग, तुटलेली प्रवेशद्वारे, अस्वच्छ परिसर आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याचे चित्र समोर आले आहे.
विशेष म्हणजे, सुमारे सहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी मुंबई APMC चा पाहणी दौरा केला होता. यावेळी सहसचिव, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बाजार आवारातील घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, सहा महिने उलटूनही बाजारपेठांमधील अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याने महापालिका आणि APMC प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
दरम्यान, मंगळवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी चारच्या सुमारास मुंबई APMC चे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, धान्य बाजाराचे प्रभारी उपसचिव, सुरक्षा अधिकारी आणि GROMA संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य बाजारपेठेची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुटलेली प्रवेशद्वारे, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची समस्या यांसह अनेक मूलभूत प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, ही समस्या केवळ धान्य बाजारपेठेपुरती मर्यादित नसून मसाला मार्किटमध्ये मागील सहा दिवसांपासून कचरा पडून असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. फळ बाजारपेठेतील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नसल्याचे चित्र आहे. आयुक्त शिंदे यांच्या सहा महिन्यांपूर्वीच्या पाहणीचे आदेश देऊन सुधा आजची परिस्थिती पाहता Apmc   प्रशासनाच्या कामकाजात फारसा फरक पडलेला नसल्याचा आरोप बाजार घटकांकडून केला जात आहे. लाखो रुपयांचे वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बाजारपेठांना किमान स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे. मात्र, पदोन्नती आणि बदलीसाठी जशी धावपळ केली जाते, तशीच जबाबदारीने काम करण्यासाठीही अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करत आहेत.
राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून ओळख असलेल्या मुंबई APMC ची स्वच्छता आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जर अशा पद्धतीने पार पाडली जात असेल, तर बाजार समितीची प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्ष आणि सचिवांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या आदेशांनाही संबंधित अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र समोर येत असल्याने प्रशासनातील समन्वय आणि नियंत्रणावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.यामुळे आता केवळ पदोन्नती आणि बदल्यांचे निर्णय न घेता प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या कामाचा लेखाजोखा तपासण्याची मागणी बाजार घटकांकडून होत आहे. कोणत्या अधिकाऱ्याने किती काम केले, कोणत्या विभागात सुधारणा झाली आणि कोणाकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे, याचे मूल्यमापन करूनच पदोन्नती व बदलीचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
स्वच्छतेचा देशपातळीवरील बहुमान मिळवणाऱ्या नवी मुंबईतच राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठेची अशी अवस्था असेल, तर या अस्वच्छतेला जबाबदार कोण? सहा महिन्यांनंतरही परिस्थिती बदलत नसेल, तर लाखोंचे वेतन घेणारे अधिकारी नेमके करतात तरी काय? हा प्रश्न आता बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्वच्छतेच्या कामावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सहसचिवांकडे स्वच्छता विभागाच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी सोपवावी. त्यांनी दररोज स्वच्छतेचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल घ्यावा. अन्यथा, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराची ओळख स्वच्छतेऐवजी अस्वच्छतेमुळे निर्माण होण्याची वेळ येईल!