राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMC फळ मार्केटच्या 55 कोटींच्या बहुउद्देशीय इमारतीत चोरट्यांचा धुमाकूळ! सहा वर्षांपासून वापराविना, लाखोंचं साहित्य लंपास!
-सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे एकाला रंगेहात पकडलं, दोघे फरार! पोलिसांना दिले ताब्यात
-APMC अभियांत्रिकी विभागाच्या भोंगळ कारभार उघड! सुरक्षा अधिकाऱ्याचा पत्राकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष, इमारतीत चोरी!
-अभियांत्रिकी व सुरक्षा यंत्रणा नेमकी करते काय? कोट्यवधींच्या प्रकल्पांमधील साहित्य चोरीला जात असताना जबाबदारी कोणाची?
-संपूर्ण चौकशीची मागणी! इमारतींची तपासणी, चोरीचा पंचनामा, आर्थिक नुकसानीचा हिशेब आणि दोषींवर कारवाई कधी होणार?
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्वचे बाजार मुंबई APMC फळ बाजारात तब्बल 55 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारत गेल्या सहा वर्षांपासून वापराविना पडून आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या इमारतीत व्यापारी आणि नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध होण्याऐवजी आता चोरट्यांनीच हात साफ करण्यास सुरुवात केली आहे. इमारतीतील तीन मजल्यांवर असलेल्या सुमारे ९४ कार्यालयांमधील विद्युत वायर, स्विच, ॲल्युमिनियमच्या पट्ट्या, टॉयलेट फ्लशसह लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चोरी करताना तिघांपैकी एका संशयिताला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडल्याने उर्वरित साहित्य वाचविण्यात यश आले. विशेष म्हणजे, या इमारतीत अनधिकृतपणे लोकांचा वावर आणि वास्तव्य असल्याने चोरी होण्याची शक्यता असल्याचा इशारा फळ मार्केटच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी यापूर्वीच मार्किट अभियंत्यांना पत्राद्वारे दिला होता. मात्र, या पत्राची दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता या चोरीप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सहा वर्षांपासून इमारत बंद, चोरट्यांसाठी मोकळे रान!
मुंबई APMCच्या फळ बाजार येथे सुमारे ५५ कोटी रुपये खर्चून बहुउद्देशीय इमारतीची उभारणी करण्यात आली. सहा मजली या इमारतीत तळ मजल्यावर ३४ गाळे,तर वरच्या तीन मजल्यांवर ९४ कार्यालय आहेत. मात्र, बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे झाले नसल्याने नवी मुंबई महापालिकेकडून अद्याप भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नाही. परिणामी, गेल्या सहा वर्षांपासून ही इमारत वापराविना पडून आहे. कोट्यवधींची गुंतवणूक करून उभारलेली इमारत वापरात आणता येत नसताना तिच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
सुरक्षा अधिकाऱ्याचा इशारा, अभियंत्यांकडून दुर्लक्ष?
या इमारतीच्या सुरक्षेबाबत यापूर्वीच गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. फळ बाजाराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित बाजार समितीच्या अभियंत्यांना पत्र देऊन इमारत पूर्णपणे बंदिस्त करण्याची मागणी केली होती. इमारतीमध्ये परप्रांतीय कामगारांसह इतर अनोळखी व्यक्ती मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वास्तव्य करतात आणि त्यांचा मुक्त वावर असतो. त्यामुळे भविष्यात चोरी अथवा अन्य अनुचित घटना घडण्याची शक्यता असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. मात्र, सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भीती प्रत्यक्षात खरी ठरली असून, वेळेत उपाययोजना झाल्या असत्या तर चोरीची घटना टाळता आली असती, अशी चर्चा बाजार आवारात सुरू आहे.
APMC मधील प्रकल्प, साहित्य चोरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर प्रश्न!
फळ बाजारात   १८ नोव्हेंबर रोजी सुरक्षा रक्षकांनी एका संशयिताला पकडले, तर अन्य दोघे फरार झाले. तिघांनी मिळून चोरी केल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती आहे. सुमारे २५ ॲल्युमिनियम पट्ट्या, अंदाजे ८०० किलो साहित्य चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीतील विद्युत वायर, स्विच, टॉयलेट फ्लश आणि अन्य साहित्यही चोरीला गेल्याचा संशय असून, सहाव्या मजल्यावरील साहित्याचीही विल्हेवाट लावल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे फळ मार्किट सारख्या 
प्लॉट क्रमांक १५ मध्येही चोरी झाल्याचे माहिती मिळत आहे. तसेच धान्य बाजारासमोरील प्लॉट क्रमांक २ मधील कोल्ड स्टोरेजमधून सबस्टेशन, जनरेटरच्या बॅटरी, एसी कॉइल आणि पाइप चोरीला गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अभियांत्रिकी विभागाने तक्रार न करता दुरुस्तीसाठी बाजार समितीच्या तिजोरीतून ८० ते ९० लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे. ठेकेदाराच्या ताब्यातील कोल्ड स्टोरेज दुरुस्तीचा खर्च बाजार समितीने का केला? अभियांत्रिकी विभाग आणि ठेकेदारांची जबाबदारी काय? मुख्य लेखाधिकाऱ्यांनी या खर्चाला मंजुरी कशी दिली? कोट्यवधींचा सेस वसूल करूनही व्यापाऱ्यांना सुविधा नाहीत. प्रकल्प धूळखात, साहित्य चोरीला आणि बाजार समितीच्या निधीची उधळपट्टी होत असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी होणार का? सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी कोण निश्चित करणार?
५५ कोटींची इमारत, न्यायालयीन वाद आणि आता चोरीचे संकट!
एकीकडे बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही भोगवटा प्रमाणपत्राअभावी सहा वर्षांपासून वापर रखडला आहे. दुसरीकडे, या इमारतीच्या बांधकामाशी संबंधित कंत्राटदाराची थकीत रक्कम आणि इतर आर्थिक दाव्यांवरून न्यायालयीन वाद सुरू आहे. कंत्राटदाराने थकीत रकमेच्या मागणीसाठी न्यायालयात धाव घेतली असून, APMC प्रशासनाकडूनही रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे इमारत वापरात आणण्याचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला असतानाच आता इमारतीतील साहित्याच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
APMC प्रशासन जबाबदारी निश्चित करणार का?
सुमारे ५५ कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत सहा वर्षे वापराविना पडून राहणे, सुरक्षेच्या दृष्टीने वारंवार सूचना देऊनही इमारत बंदिस्त करण्यासाठी उपाययोजना न होणे आणि आता लाखो रुपयांचे साहित्य चोरीला जाणे, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या पूर्वसूचना संबंधित अभियंत्यांपर्यंत पोहोचल्या होत्या का? त्यावर काय कार्यवाही करण्यात आली? इमारतीत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्यांना कोणाचे अभय होते? तसेच यापूर्वी चोरीला गेलेल्या साहित्याची जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी APMC प्रशासनाने तातडीने अंतर्गत चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. तसेच APMC पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून पकडलेल्या संशयितासह फरार साथीदारांचा शोध घ्यावा आणि इमारतीतील यापूर्वी झालेल्या चोरींचाही तपास करावा, अशी मागणी बाजार घटकांकडून होत आहे.