राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMCमध्ये 55 कोटींची इमारतवर चोरट्यांचा डल्ला!
30 लाखांचे साहित्य चोरीला! 17 कोटींचा प्रकल्प 55 कोटींवर 7 कोटींचे दोन पूलही वापराविना!
कोट्यवधींची इमारत, सुरक्षा यंत्रणा कुठे?
चार मजल्यांवर तोडफोड अभियंते आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCच्या फळ बाजारातील बहुउद्देशीय इमारतीची दुरवस्था अभियंता आणि सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांपासून विद्यमान अधिकाऱ्यांपर्यंत जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाई करण्याची बाजार घटकांची मागणी.
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) फळ बाजारातील व्यापारी, शेतकरी आणि बाजार घटकांसाठी उभारण्यात आलेली तब्बल ५५ कोटी रुपयांची बहुउद्देशीय इमारत सहा वर्षांनंतरही वापराविना पडून आहे. व्यापाऱ्यांना आधुनिक कार्यालयीन सुविधा उपलब्ध करून देणे, बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांना हक्काची जागा देणे आणि फळ बाजारातील वाहतूक कोंडी कमी करणे, या उद्देशाने उभारलेल्या प्रकल्पाचे भवितव्य अद्यापही न्यायालयीन , तांत्रिक मंजुरी आणि भोगवटा प्रमाणपत्राच्या (OC) प्रश्नात अडकले आहे. त्यातच आता या बंद इमारतीतील लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३० लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे , APMC पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोट्यवधींचा प्रकल्प उभारणाऱ्या यंत्रणेच्या निष्काळजीपणाची किंमत आता राष्ट्रीय महत्वाचे बाजार समितीला मोजावी लागत असल्याचा आरोप बाजार घटकांकडून केला जात आहे.
94 कार्यालये, चार मजले चोरट्यांनी इमारतच केली लक्ष्य!
बाजारत मुख्य रस्त्यावर असलेल्या या बहुउद्देशीय इमारतीमध्ये चार मजल्यांवर मिळून एकूण ९४ कार्यालये आहेत. मात्र, इमारतीचा वापर सुरू नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाल्याने चोरट्यांनी टप्प्याटप्प्याने इमारतीतील साहित्यावर हात साफ केल्याचे समोर येत आहे. प्रत्येक मजल्यावरील विद्युत वायरिंग, एमसीबी, वॉशबेसिन, बाथरूमच्या दरवाजांच्या अॅल्युमिनियम फ्रेम, अग्निशमन यंत्रणेचे जोडणी साहित्य, सीलिंग फॅन, मोठे अॅडजस्टेबल फॅन तसेच खिडक्यांच्या अॅल्युमिनियम फ्रेम चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पाचव्या मजल्यावरील संपूर्ण साहित्यही गायब झाल्याचे सांगितले जात आहे. चोरट्यांनी इमारतीतील साहित्याची पद्धतशीरपणे चोरी केली असून, काही साहित्य पॅकिंग करून ठेवलेले असताना पकडण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या आणि चोरीसाठी तयार ठेवलेल्या साहित्याची अंदाजित किंमत जवळपास ३० लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर चोरी सुरक्षा यंत्रणा झोपली होती का?
सर्वात गंभीर बाब म्हणजे ही चोरी एकाच वेळी झालेली नसून, वेगवेगळ्या मजल्यांवर टप्प्याटप्प्याने तोडफोड करून साहित्य काढण्यात आले आहे. मग इमारतीची नियमित पाहणी करणारे अभियंते आणि सुरक्षा अधिकारी नेमके काय करत होते? मुख्य सुरक्षा अधिकारी, मार्केट अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना या प्रकाराची माहिती का मिळाली नाही? इमारतीतून साहित्य बाहेर जात असताना सुरक्षा यंत्रणेने तपासणी केली नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नसताना संपूर्ण इमारत बंदिस्त करून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? दररोजची पाहणी आणि सुरक्षा नोंदी तपासल्या जात होत्या का? या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी बाजार घटकांकडून होत आहे.
१७ कोटींचा प्रकल्प ५५ कोटींवर सहा वर्षांपासून OC रखडली!
या प्रकल्पाची सुरुवातीची किंमत सुमारे १७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रकल्पाचा खर्च वाढून बिना निविदा जवळपास ५५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. एवढा मोठा निधी खर्च करून उभारलेली इमारत आजही वापरात आलेली नाही. मूळ बांधकाम आराखड्याप्रमाणे काम झाले नसल्याने भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण झाल्याची चर्चा आहे. मात्र, २०२० पासून सुधारित बांधकाम आराखडा महापालिकेकडे सादर करून OC मिळवण्याची प्रक्रिया करता आली असती, असा बाजार घटकांचा दावा आहे. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा वेळेत का झाला नाही? इमारतीच्या बांधकामापासून ते आजपर्यंत अभियांत्रिकी विभागातील तत्कालीन अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि सध्याच्या अधिकाऱ्यांनी नेमकी कोणती कार्यवाही केली? प्रकल्पाला अडचणीत टाकून टप्या टप्याने स्वच्छनिबृत घेणाऱ्या या अभियंतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विगर गाळा धारकांकडून करण्यात येत आहे.
OC साठी ७० ते ८० लाखांचा अतिरिक्त लीज प्रीमियम!
भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सिडकोकडून मुदतवाढ आणि संबंधित परवानग्यांच्या प्रक्रियेत अतिरिक्त लीज प्रीमियम म्हणून बाजार समितीला आतापर्यंत अंदाजे ७० ते ८० लाख रुपये भरावे लागल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासह सिडको, महापालिका आणि न्यायालयीन कामकाजाचा पाठपुरावा करण्यासाठी बाजार समितीने एका उपअभियंत्याची विशेष नियुक्ती केली होती. त्यांना नियमित वेतनाव्यतिरिक्त दरमहा १० हजार रुपये विशेष भत्ता दिला जात होता. मात्र, विशेष भत्ता देऊनही इमारतीची OC मिळाली नाही. संबंधित अभियंत्याला या कामासाठी आतापर्यंत जवळपास तीन लाख रुपये विशेष भत्ता देण्यात आल्याचे सांगितले जाते. मग विशेष नियुक्तीचा उद्देश काय साध्य झाला? लाखो रुपयांचा अतिरिक्त खर्च करूनही प्रकल्प मार्गी का लागला नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
OC मिळाली असती तर 1 कोटींहून अधिक नुकसान टळले असते?
बाजार घटकांच्या म्हणण्यानुसार, वेळेत OC मिळाली असती तर इमारतीचा वापर अथवा विक्री प्रक्रिया मार्गी लागू शकली असती. त्यामुळे सिडकोला भरावे लागलेले ७० ते ८० लाख रुपयांचे अतिरिक्त लीज प्रीमियम, चोरीला गेलेले अंदाजे ३० लाखांचे साहित्य आणि नवी मुंबई महापालिकेला भरावा लागलेला जवळपास ५० लाख रुपयांचा मालमत्ता कर, अशा खर्चांचा भार टाळता आला असता किंवा कमी करता आला असता. म्हणजेच OC रखडल्यामुळे बाजार समितीवर अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करून प्रत्यक्ष नुकसान किती झाले, याची निश्चिती करण्याची मागणी होत आहे.
सात कोटींचे दोन पूलही वापराविना!
बहुउद्देशीय इमारतीची ही अवस्था असतानाच फळ बाजार परिसरातील सुमारे सात कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले दोन पूलही वापराविना पडून असल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका बाजूला कोट्यवधींचे प्रकल्प पूर्ण होऊनही वापरात येत नाहीत, तर दुसरीकडे तयार इमारतीतून आणि पायाभूत सुविधांमधून बाजार समितीला अपेक्षित फायदा मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा विकास आराखडा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील तफावत उघड होत आहे.
तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांपासून विद्यमान अधिकाऱ्यांपर्यंत चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणात केवळ चोरीचा गुन्हा दाखल करून प्रश्न सुटणार नाही. इमारतीचे बांधकाम, सुधारित नकाशा, OC मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा, सिडकोकडून आकारण्यात आलेला अतिरिक्त लीज प्रीमियम, महापालिकेचा मालमत्ता कर, विशेष भत्त्याची नियुक्ती आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी या सर्व बाबींची एकत्रित चौकशी होणे आवश्यक असल्याचे बाजार घटकांचे म्हणणे आहे.पणन मंत्री व राष्ट्रीय महत्वाचे बाजाराचे अध्यक्ष व मुंबई APMC सचिव यांनी तत्कालीन अधीक्षक अभियंत्यांपासून कार्यकारी अभियंते, उपअभियंते, मार्केट अभियंता आणि सध्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची भूमिका तपासावी. तसेच मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याचीही जबाबदारी निश्चित करावी. दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बाजार समितीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
एकूणच, ५५ कोटींची इमारत सहा वर्षे वापराविना, सात कोटींचे दोन पूल निष्क्रिय आणि आता इमारतीतील लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार... राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारातील या कारभाराची जबाबदारी नेमकी कोणाची? हा प्रश्न आता बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.