Mumbai APMC News: राष्ट्रीय महत्वाचे बाजार मुंबई APMCत पानटपऱ्यांच्या आड अमली पदार्थांचा काळा धंदा!
गांजा, MD, गुटखा अन् दारू जप्त पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांना बेड्या तर एक फरार
तीन पानटपऱ्यांवर क्रेनचा बुलडोझर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि सचिव राजाराम धोंडकर यांचा पुढाकार!
Mumbai APMC News: राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMC बाजार आवारत पान टपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या कथित अवैध व्यवसायावर अखेर पोलिसांचा बुलडोझर फिरला. गांजा, MD, गुटखा आणि दारू जप्त करत पाच जणांना अटक, तर तीन पानटपऱ्यांचे थेट निष्कासन करण्यात आले.
मुंबई APMC भाजीपाला आणि फळ मार्केट मध्ये अमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा, तंबाखू आणि अवैध देशी दारूच्या विक्रीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि APMC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजा, मेफेड्रॉन (MD), गुटखा, तंबाखू आणि देशी दारू असा एकूण ८० हजार   रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पाच आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. याचवेळी भाजीपाला   मार्केटच्या गेट क्रमांक ७ मधील तीन   पानटपऱ्या क्रेनच्या साहाय्याने उचलून बाजार आवाराबाहेर काढण्यात आल्या. विशेष म्हणजे, यापूर्वी नोटिसा आणि सील करण्यापुरती मर्यादित राहणारी कारवाई आता थेट पानटपऱ्या निष्कासित करण्यापर्यंत पोहोचली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि APMC सचिव राजाराम धोंडकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या कारवाईमुळे बाजारातील अवैध व्यवसायांवर लगाम बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पानटपऱ्यांच्या आडून अमली पदार्थांचा व्यवसाय?
मुंबई APMC   फळ आणि भाजी मार्केट परिसरातील काही पानटपऱ्यांमध्ये समोरून पाण्याच्या बाटल्या, पान आणि किरकोळ वस्तूंची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, याच पानटपऱ्यांच्या आडून गांजा, गुटखा, तंबाखू आणि देशी दारूची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. संपूर्ण बाजार आवारात अमली पदार्थांचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, यामध्ये 'गुप्ता ब्रदर्स' यांचा सहभाग असल्याचा आरोपही केला जात आहे.
गेट क्रमांक ६ आणि ७ परिसरात धडक कारवाई
एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या पथक सह नवी मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने संयुक्त मोहीम राबविली. गेट क्रमांक ६ परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या नदीम कुरेशी याच्यावर कारवाई करून गांजा जप्त करण्यात आला. याशिवाय फळ व भाजी मार्केट परिसरातून अमली पदार्थ आणि प्रतिबंधित वस्तूंचा साठा हस्तगत करण्यात आला.
संयुक्त कारवाईत एकूण ८५७ ग्रॅम गांजा, ६.५ ग्रॅम मेफेड्रॉन (MD), गुटखा, तंबाखू आणि जी.एम. देशी दारू असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहबाज हसीब खान (२०), दानिश जबीर शेख (४१), चांदबाबू कासीम अली (२०), युसूफ निजामुद्दीन खान (२१) आणि रोहित राकेश गुप्ता (२२) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यातील चार आरोपी तुर्भे परिसरातील, तर एक आरोपी नेरुळ येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. राकेश गुप्ता हा आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
३१ बाटल्या देशी दारू जप्त स्वतंत्र कारवाई
भाजीपाला मार्केटच्या गेट क्रमांक ७ जवळ विनापरवाना देशी दारू बाळगणाऱ्या विनोद साह (५०, रा. चैनपूर, जि. सारण, बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून १ हजार २४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ३१ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच गेट क्रमांक ७ परिसरातील तीन अनधिकृत पानटपऱ्या क्रेनच्या मदतीने हटविण्यात आल्या.
सील नव्हे, आता थेट पानटपऱ्या जमीनदोस्त!
APMC परिसरात यापूर्वीही अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून अवैध व्यवसाय करणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. काही पानटपऱ्या सीलही करण्यात आल्या मात्र दोन महिन्यांनंतर पुन्हा त्या सुरू होत असल्याचे चित्र होते. त्यामुळे केवळ नोटीस बजावणे किंवा सील करणे पुरेसे नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता APMC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आणि बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी समन्वय साधत तीन   पानटपऱ्या क्रेनच्या साहाय्याने थेट बाजार आवाराबाहेर काढल्या. यापुढे ज्या पानटपऱ्यांमध्ये अमली पदार्थ आढळतील, त्यांच्याविरोधातही निष्कासनाची कारवाई करण्यात येणार माहिती मुंबई Apmc सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांनी दिली आहे.
बाजाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
मुंबई APMC मध्ये दररोज हजारो शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार, वाहनचालक आणि ग्राहकांची वर्दळ असते. अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात पानटपऱ्यांच्या आडून अमली पदार्थ, गुटखा आणि अवैध दारूची विक्री होत असल्याचे प्रकार गंभीर मानले जात आहेत. पोलिसांची ही मोहीम केवळ काही आरोपींना अटक करण्यापुरती मर्यादित न राहता अमली पदार्थांचा पुरवठा करणारे मुख्य सूत्रधार, त्यांचे नेटवर्क आणि बाजारातील अशा अवैध व्यवसायांना मिळणारे संरक्षण यांच्यापर्यंत पोहोचणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.