मुंबई APMC फळ मार्केटमध्ये मोठी कारवाई,भाड्याने दिलेले 791 व 792 गाळे सील, अनधिकृत व्यापारावर प्रशासनाची धडक मोहीम
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) प्रशासनाने फळ मार्केटमध्ये मोठी कारवाई करत ७९१ आणि ७९२ क्रमांकाचे दोन गाळे सील केले आहेत. संबंधित गाळेधारक स्वतः व्यापार न करता ते इतरांना भाड्याने देऊन अनधिकृत पद्धतीने शेतमालाचा व्यापार करण्यास परवानगी देत असल्याचे उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मुंबई APMC होलसेल फळ मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यापार सुरू असून अनेक व्यापाऱ्यांनी आपले गाळे भाड्याने दिल्याचे समोर आले आहे. विशेषतः प्रशासनाकडून जे कारवाई करण्यात आली आहे ती M विंगमधील दोन   गाळ्यांमध्ये ८ ते १० जणांना बसवून त्यांच्याकडून व्यापार करून घेतला जात होता. या लोकांकडे व्यापारासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती. गाळा एकाचा ,परवानगी एकाची व्यवसाय करतात तिसरा असा खेळ सुरू आहे .ज्याच्या नावावर   गाळा आहे तो व्यापार न करता प्रत्यक्षात दुसरेच लोक त्यामध्ये व्यवसाय करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.आणि गळा धारक या लोकाकडून लाखो रुपये भाडे घेत होते .
सूत्रांच्या माहितीनुसार, या पद्धतीने गाळे भाड्याने देऊन संबंधित व्यापारी वर्षाला सुमारे ३० ते ४० लाख रुपये कमावत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, याहून धक्कादायक बाब म्हणजे संबंधित   व्यापाऱ्यांनी गाळ्यांची विक्री करण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये “हा गाळा घेतल्यास वर्षाला सुमारे ३५ लाख रुपये उत्पन्न मिळेल” असा दावा करण्यात आला होता. या गाळ्यांची किंमत तब्बल ४ ते ५ कोटी रुपये ठेवण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही माहिती व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत कारवाई केली.
सध्या फळ मार्केटमध्ये आंब्याचा हंगाम सुरु असल्याने “नीचे दुकान, ऊपर मकान” अशी परिस्थिती दिसून येत आहे. अनेक व्यापारी स्वतः व्यापार न करता गाळे भाड्याने देत असून काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून त्याच ठिकाणी कामगारांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मार्केटमधील जवळपास ७० टक्के व्यापार अशाच पद्धतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. गाळे ज्यांच्या नावावर आहेत त्यापैकी सुमारे ७० टक्के गाळा धारक स्वतः व्यापार करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाजारात घाण, चोरी, शेतकऱ्यांची फसवणूक आणि बाजार समितीचा महसूल बुडण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर प्रशासन फळ आणि भाजी मार्केटमध्ये कामगारांना राहण्याची व्यवस्था बंद करावी तसेच अनधिकृत व्यापारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रामाणिक व्यापारी आणि शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
सध्या दोन गाळ्यांवर कारवाई झाली असली तरी मार्केटमधील उर्वरित अनधिकृत व्यापारावर प्रशासन कधी कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहेत.