राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCची सुरक्षा रामभरोसे?
एक्स्पोर्ट हाऊससमोरील विद्युत उपकेंद्रात विजेचा धक्का अनोळखीचा मृत्यू
रात्री अनधिकृत प्रवेश, अमली पदार्थांच्या सेवनाच्या चर्चांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पोलिसांकडून तपास सुरू
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. फळ मार्केटमधील एक्स्पोर्ट हाऊससमोरील विद्युत उपकेंद्रात विजेचा धक्का लागून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बाजारातील रात्रीची सुरक्षा, अनधिकृत प्रवेश आणि संशयितांच्या वर्दळीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूया हा विशेष रिपोर्ट…
राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई APMCमध्ये १६ जुलै रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण बाजार परिसर हादरला आहे. फळ मार्केटमधील एक्स्पोर्ट हाऊससमोरील विद्युत उपकेंद्रात एका अनोळखी व्यक्तीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.
मात्र या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत. संबंधित व्यक्ती उच्चदाबाच्या विद्युत उपकेंद्रापर्यंत कशी पोहोचली? त्याला प्रवेश कसा मिळाला? आणि तो त्या ठिकाणी नेमका काय करत होता? या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, बाजारातील काही व्यापारी व कामगाराच्या   दावा आहे की, रात्रीच्या वेळी काही संशयित व्यक्ती बाजार परिसरात मुक्तपणे वावरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही जण अमली पदार्थांचे सेवन करतात, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कँटीनमध्ये जेवण आणि चायनीज खाद्यपदार्थ खातात आणि त्यानंतर चोरीच्या उद्देशाने बाजारात फिरतात. काही पानटपऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत गुटखा, तंबाखू आणि इतर प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याचाही आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. म्हणजे अमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाण राष्ट्रीय बाजार आहे . या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणांनी त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी अवघ्या तीन दिवसांत चोरीचे सहा प्रयत्न झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यापैकी तीन संशयितांना व्यापाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचेही सांगितले जाते. सर्वात महत्वाचे बाब अशी आहे की ज्यावेळी अन्न औषध प्रशासन व पोलिस अधिकारी बाजार आवारात कारवाई साठी येतात त्यावेळी संबंधित टोळीला अगोदर माहिती याच सुरक्षा कर्मचऱ्याकडून देण्यात येत त्यामुळे ही टोळी आजपर्यंत बाजार आवारात बाबरतात .अशी माहिती काही व्यापाऱ्यांनी दिली आहे .त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो… जर व्यापारीच चोर पकडत असतील, तर सुरक्षा विभागाची भूमिका नेमकी काय?
व्यापाऱ्यांचा आणखी एक आरोप म्हणजे, काही ठिकाणी संरक भिंतींचा वापर करून रात्रीच्या वेळी अनधिकृत प्रवेश केला जातो. काही विद्युत उपकेंद्रे पुरेशा सुरक्षेविना असल्याने कोणालाही त्या परिसरात पोहोचणे आणि त्याच ठिकाणी अमली पदार्थ सेवन करत असतात . एवढेच नव्हे तर काही विद्युत उपकेंद्रांजवळ पुठ्ठे, लाकडी पेट्या आणि इतर ज्वलनशील साहित्य साठवून ठेवले जात असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आवश्यक त्या बाबींची चौकशी केली जात असून बाजार समितीला सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत सूचना करण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराच्या सुरक्षेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना अशा घटना घडत असतील, तर सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून रात्रीची सुरक्षा, विद्युत उपकेंद्रांचे संरक्षण आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी बाजार घटकाकडून होत आहेत. तसेच राज्याचे पणन मंत्री आणि राष्ट्रीय बाजाराचे अध्यक्ष यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
विद्युत उपकेंद्रातील मृत्यू हा केवळ एक अपघात होता की सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींचा परिणाम? याचे उत्तर पोलीस तपासातून स्पष्ट होईल. मात्र या घटनेनंतर राष्ट्रीय महत्त्वाच्या मुंबई APMCच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणा किती गांभीर्याने पाहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्यापाऱ्यांची मागणी
या घटनेनंतर बाजार घटकांनी पुढील मागण्या केल्या आहेत—
* संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट
* संरक्षक भिंतींची तातडीने दुरुस्ती
* सर्व विद्युत उपकेंद्रांची सुरक्षा वाढविणे
* रात्रीची गस्त आणि सीसीटीव्ही देखरेख मजबूत करणे
* अनधिकृत प्रवेश आणि बेकायदेशीर हालचालींवर विशेष मोहीम राबविणे