तुर्भे MIDCमध्ये FDAची धडक कारवाई, साधना एंटरप्राइजचा परवाना रद्द एक्सपायरी डेट, उत्पादन तारीख आणि घटकांची माहिती बदलून खाद्यपदार्थांची विक्री, ७५ लाखांचा माल जप्त
नवी मुंबई : तुर्भे MIDC परिसरातील खाद्यपदार्थांमध्ये एक्सपायरी डेट, उत्पादन तारीख आणि घटकांची माहिती बदलून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत समोर आला आहे. तुर्भे MIDCमधील साधना एंटरप्राइजवर FDAने धडक कारवाई करत तब्बल ४ हजार ९४२ कार्टन माल जप्त केला असून, त्याची बाजारातील किंमत सुमारे ७५ लाख २१ हजार रुपये आहे. या प्रकरणी कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असून, मालक आणि भागीदारांविरोधात तुर्भे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी साधना एंटरप्राइजवर छापा टाकून तपासणी केली असता, खाद्यपदार्थांचे रिपॅकिंग आणि लेबलिंग करून मूळ माहितीमध्ये फेरफार केला जात असल्याचे निदर्शनास आले. खाद्यपदार्थांवरील मूळ उत्पादन तारीख आणि एक्सपायरी डेट बदलून त्यावर नवीन तारखा टाकल्या जात होत्या. तसेच पॅकेटवरील खाद्यपदार्थांमधील घटकांची माहितीही बदलली जात असल्याचे तपासात समोर आले.
कारवाईदरम्यान सुमारे ३० हजार रुपयांचा विनालेबल आणि एक्सपायरी डेट संपलेला माल आढळून आला. पॅकेजिंगमध्ये फेरफार केल्यानंतर हा माल पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा संशय तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
FDAच्या कारवाईत बटाटा चिप्स, कॉर्न स्नॅक्स, कुरकुरे, इन्स्टंट नूडल्स, रेडी-टू-ईट पनीर टिक्का, दम आलू, रसोई पनीर भुर्जी, दाल मखनी आणि मयोनीज यासह विविध खाद्यपदार्थ आढळून आले. तसेच थम्स अप आणि लिंक यांसारखी शीतपेयेही कारवाईत आढळली.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, तुर्भे MIDCप्रमाणेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी आणि कारवाई करावी, अशी मागणी बाजारातील घटकांकडून होत आहे. मुंबई APMCमध्ये विविध खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर आवक-जावक आणि विक्री होत असल्याने येथील खाद्यपदार्थांच्या लेबलिंग, एक्सपायरी डेट आणि रिपॅकिंग प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.