साखरेचा ऐतिहासिक विक्रम! ₹४२०० प्रति क्विंटल किरकोळ दर ₹५० किलो
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
देशात लांबलेला मान्सून, देशांतर्गत बाजारातील घटलेला साखर साठा आणि आगामी हंगामातील उत्पादनाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे साखरेच्या दराने ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. सध्या किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत पोहोचला असून, कारखाना स्तरावर एम-४० साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,२०० रुपये इतका झाला आहे. साखर कारखान्यांच्या इतिहासात प्रथमच एवढ्या उच्च दराने साखरेची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी व उद्योग क्षेत्रातून देण्यात आली.
दोन वर्षांनंतर बाजारात पुन्हा तेजी
गेल्या दोन वर्षांपासून साखरेचे दर तुलनेने स्थिर होते. मात्र यंदा उन्हाळ्यात वाढलेला खप, कमी झालेला साठा आणि पुढील उत्पादनाबाबतची साशंकता यामुळे बाजारात तेजी आली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आगामी काही आठवड्यांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आंतरराष्ट्रीय बाजाराचाही परिणाम
आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचा तुटवडा जाणवत असून सरासरी दर प्रतिकिलो ४३ रुपये आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध कायम ठेवल्याने देशांतर्गत बाजारातील उपलब्धता टिकून आहे. अन्यथा दर आणखी वाढले असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्राझीलमध्ये इथेनॉलकडे वाढता कल
जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये यंदा इथेनॉल निर्मितीकडे अधिक कल वाढताना दिसत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या हंगामात तेथे सुमारे ३५० लाख टन साखरेचे उत्पादन होते आणि त्यापैकी जवळपास ७० टक्के साखर निर्यात केली जाते. जागतिक कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे ब्राझीलमध्ये ऊसाचा वापर इथेनॉलसाठी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम जागतिक साखर पुरवठ्यावर होऊ शकतो.
देशातील साखर स्थिती (२०२५-२६)
एकूण उत्पादन २७४ लाख टन
महाराष्ट्राचे उत्पादन ९९ लाख टन
मागील शिल्लक साठा ५५ लाख टन
यंदाचा प्रारंभीचा साठा ४० लाख टन
देशाची वार्षिक गरज २८५ लाख टन
“यंदा जूनपर्यंत कडक उन्हाळा राहिल्याने साखरेचा खप वाढला. त्यात पावसाची अनिश्चितता असल्याने पुढील हंगामातील उत्पादनाबाबत साशंकता आहे. त्यामुळे सध्या दर वाढले आहेत मात्र ही तेजी किती काळ टिकेल, हे सांगणे कठीण आहे.”
— विजय औताडे, साखर उद्योग तज