APMC NEWS IMPACT | राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCमध्ये मोठा प्रशासकीय निर्णय! 23 वर्षे मुख्यालयात ठाण मांडलेल्या अभियंत्यासह 4 अभियंत्यांच्या बदल्या
APMC NEWS IMPACT | राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार मुंबई APMCमध्ये मोठा प्रशासकीय निर्णय! 23 वर्षे मुख्यालयात ठाण मांडलेल्या अभियंत्यासह 4 अभियंत्यांच्या बदल्या
बाजारातील विकासकामांवरील सातत्याने उपस्थित झालेल्या प्रश्नांची अखेर दखल.
APMCच्या अभियांत्रिकी विभागात ‘अनागोंदी कारभार’? पणन मंत्र्यांच्या निर्देशानंतर सचिव जरे यांची   कारवाई
कोट्यवधींच्या कामांवर प्रश्नचिन्ह… अखेर APMCच्या 4 अभियंत्यांच्या बदल्या बाजारात एकच चर्चा!
पावसातील गोंधळ, रखडलेले प्रकल्प आणि व्यापाऱ्यांचा संताप अखेर APMCच्या अभियांत्रिकी विभागात मोठे फेरबदल
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात अभियांत्रिकी विभागाच्या बदल्या झाल्या… पण सुधारणा होणार का?
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाला की बाजार आवारात पाणी साचणे आणि पाऊस थांबल्यानंतरही अनेक भाग जलमय राहणे, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव, कचऱ्याचे ढीग, फुटपाथवरील अतिक्रमणे, खराब रस्ते, अपूर्ण ड्रेनेज लाईन, पॅसेज आणि गाळ्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अपेक्षित परिणाम न दिसल्याने मुंबई APMCच्या अभियांत्रिकी विभागावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. नियोजनशून्य कामकाज आणि कथित टक्केवारीच्या संस्कृतीमुळे बाजार समितीची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा व्यापारी व बाजार घटकांकडून वारंवार होत होती. या सर्व घडामोडी APMC NEWS डिजिटल चॅनेलने सातत्याने वृत्तांद्वारे आणि व्हिडिओद्वारे समोर आणल्या. या वृत्तांची दखल घेत राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचे अध्यक्ष तथा पणन मंत्री जयकुमार रावल आणि पणन सचिवांनी अभियांत्रिकी विभागात मोठी खांदेपालट करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर येत असून, त्यानुसार मुंबई APMCचे सचिव शरद जरे यांनी चार अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढल्याची चर्चा आहे. या निर्णयामुळे बाजार घटकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभियांत्रिकी विभागात ही पहिली मोठी प्रशासकीय कारवाई मानली जात आहे. या बदल्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे उपअभियंता मेहबूब कासिम अली बेपारी. जवळपास २८ वर्षे APMCमध्ये कार्यरत असलेल्या बेपारी यांनी त्यापैकी सुमारे 23 वर्षे मुख्यालयातच काम केले. इतक्या दीर्घ काळात त्यांची इतर कोणत्याही बाजारात बदली झाली नव्हती. आता त्यांची मुख्यालयातून फळ मार्केटमध्ये बदली करण्यात आली आहे.
याच फेरबदलात फळ मार्केटचे उपअभियंता सुदर्शन भोजनकर यांची भाजीपाला मार्केटमध्ये, भाजीपाला मार्केटचे अभियंता पांडुरंग पिंगळे यांची धान्य मार्केटमध्ये तर कांदा-बटाटा मार्केटचे उपअभियंता एम. के. अल्जी यांच्याकडे मुख्यालय अभियंत्या मसाला मार्केटमध्ये उप अभियंता सतीश देशमुख यांच्याकडे अतिरिक्त कारभार असलेल्या धान्य मार्किट काढण्यात आल्याचे समजते.
मुख्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह?
बाजारात सुरू असलेल्या चर्चेनुसार, उप अभियंता मेहबूब बेपारी यांच्या कार्यकाळात अति धोकादायक कांदा-बटाटा मार्केटचा पुनर्विकास दीर्घकाळ रखडला. कोल्ड स्टोरेज उभारल्यानंतरही त्याचा अपेक्षित वापर झाला नाही. ड्रेनेजच्या कामांवर खर्च होऊनही प्रत्यक्ष परिणाम दिसला नाही. न्यायालयीन, CIDCO आणि NMMC संदर्भातील कामांसाठी विशेष मानधन मंजूर असूनही अनेक प्रकरणे प्रलंबित राहिल्याने तत्कालीन सचिवांनी ते मानधन रद्द केल्याची माहितीही चर्चेत आहे. याशिवाय मुख्यालय इमारतीची दुरवस्था, मसाला मार्केटमधील FSI आणि कँटीनच्या ‘चेंज ऑफ यूज’ प्रकरणांवरील निर्णय प्रलंबित राहणे, मोबाईल टॉवर व जाहिरात फलकांशी संबंधित कथित अनियमितता अशा अनेक मुद्द्यांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असल्याची चर्चा बाजार परिसरात सुरू आहे. मात्र, या सर्व बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
फळ मार्केटमधील प्रकल्पांवरही प्रश्न
फळ मार्केटचे उपअभियंता सुदर्शन भोजनकर यांच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांसाठी सुमारे ६० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली बहुउद्देशीय इमारत आणि दोन पूल आजही पूर्ण क्षमतेने वापरात आलेले नाहीत, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. सहा वर्षे उलटूनही इमारतीला अद्याप OC नाही . पुलांचा वापर होत नसल्याने वाहतूक कोंडी, पदपथावर अतिक्रमण, अनधिकृत व्यापार आणि पॅसेजची अपूर्ण कामे हे प्रश्न कायम असल्याने त्यांची भाजीपाला मार्केटमध्ये बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
भाजीपाला मार्केटमधील कामांवरही टीका
भाजीपाला मार्केटमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचणे, नालेसफाईतील त्रुटी, जावक गेटवर ड्रेनेज सुविधेअभावी एक ते दोन फूट पाणी साचणे, अशा समस्या सातत्याने समोर येत आहेत. सुमारे आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची जबाबदारी अभियंता पांडुरंग पिंगळे यांच्याकडे होती. यामध्ये चांगल्या अवस्थेतील काँक्रीट रस्ते तोडून गेटवर नवीन रस्ते बांधणे, निकृष्ट दर्जाच्या भिंत दुरुस्तीची कामे, वापरण्यायोग्य पायऱ्या काढून नव्या उभारणे, पॅसेज फ्लोअरिंगची अपूर्ण कामे, वर्षभर प्रलंबित वॉटरप्रूफिंग आणि बीम-कॉलमच्या स्ट्रक्चरल दुरुस्तीच्या दर्जाबाबत व्यापाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. APMC NEWS डिजिटल चॅनेलने यासंदर्भात अनेक वृत्तांत प्रसिद्ध केले होते.
मसाला मार्केटच्या उपअभियंत्याकडून धान्य मार्केटचा अतिरिक्त कार्यभार काढला.
या फेरबदलात आणखी एक महत्त्वाचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. मसाला मार्केटचे उपअभियंता सतीश देशमुख यांच्याकडे धान्य मार्केटचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मात्र, यंदाच्या पहिल्याच पावसात धान्य मार्केटमध्ये रस्ते आणि गाळ्यांसमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच गटार लाईनवरील चेंबरवर योग्य पद्धतीने झाकण (कव्हर) न बसविल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याची बाबही समोर आली होती. या घटनांनंतर धान्य मार्केटमधील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर सतीश देशमुख यांच्याकडील धान्य मार्केटचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पारदर्शकतेसाठी पाऊल की केवळ दिखावा?
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर अभियांत्रिकी विभागातील ही पहिली मोठी प्रशासकीय कारवाई मानली जात आहे. मात्र, केवळ बदल्या करून प्रश्न सुटणार का, की प्रलंबित कामांची जबाबदारीही निश्चित केली जाणार, असा प्रश्न व्यापारी आणि बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.
* मेहबूब बेपारी : मुख्यालय → फळ मार्केट
* सुदर्शन भोजनकर : फळ मार्केट → भाजीपाला मार्केट
* पांडुरंग पिंगळे : भाजीपाला मार्केट → धान्य मार्केट
* एम. के. अल्जी : कांदा-बटाटा मार्केट → मुख्यालयाचा कार्यभार
* सतीश देशमुख : धान्य मार्केटचा अतिरिक्त कार्यभार काढून → मसाला मार्केटमध्ये