राष्ट्रीय महत्त्वाचे बाजार मुंबई APMCत RTIचे ‘दबावतंत्र’? पदोन्नतीपासून अतिक्रमणांपर्यंत हस्तक्षेपाचे आरोप!
माहिती अधिकाराच्या नावाखाली अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या तक्रारी कथित ‘सेटलमेंट’च्या आरोपांनी बाजारात खळबळ!
मुंबई APMCचा कारभार राजकीय पदाधिकारी चालवतात की प्रशासन?
पदोन्नती, बदल्या आणि अतिक्रमणांत बाहेरील हस्तक्षेप पणन मंत्री व मुंबई APMC अध्यक्ष् लक्ष घालणार का?
नवी मुंबई : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार   मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सध्या एक वेगळेच समांतर सत्ताकेंद्र निर्माण होत असल्याची चर्चा बाजार आवारात रंगू लागली आहे. बाजार समितीच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीपासून बदल्यांपर्यंत, विभागीय कारवाईपासून बांधकामांपर्यंत आणि बाजारातील अतिक्रमणांपासून जागांच्या वापरापर्यंत प्रत्येक विषयात काही राजकीय पदाधिकारी आणि तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे, एखाद्या अधिकाऱ्याने नियमबाह्य कामाला विरोध केला किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली की त्याच विभागात माहिती अधिकाराच्या अर्जांचा मारा सुरू होतो, अशी चर्चा आहे. काही प्रकरणांत माहिती अधिकाराच्या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव आणून कथित तडजोडी केल्या जात असल्याचे आरोपही केले जात आहेत. फुटपाथवरील कार्यालये, दुकाने, पॅसेजमधील शेतमाल विक्री आणि जागांच्या वापरासंबंधीही अशा तडजोडींच्या तक्रारी चर्चेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारात प्रशासनाचा निर्णय अंतिम की बाहेरील दबावगटांचा, असा सवाल आता बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.
जनहिताचा RTI की ब्लॅकमेलिंगचा कथित नवा व्यवसाय?
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा सामान्य नागरिकांच्या हातात प्रशासनाला जाब विचारण्याचे प्रभावी शस्त्र आहे. सरकारी कामकाजात पारदर्शकता आणणे, भ्रष्टाचार उघड करणे आणि प्रशासनाला उत्तरदायी बनविणे हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. मात्र, याच कायद्याचा आधार घेत काही जणांनी स्वतःचे हित साधण्याचा कथित उद्योग सुरू केला आहे का, असा प्रश्न मुंबई APMCमध्ये उपस्थित होत आहे.
बाजार समितीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विविध नावांनी माहिती अधिकाराचे अर्ज दाखल करायचे, अधिकाऱ्यांना अपील आणि तक्रारींची भीती दाखवायची, त्यानंतर संबंधित कामांमध्ये हस्तक्षेप करून कथित तडजोडी करायच्या, असे प्रकार घडत असल्याचे आरोप आहेत.
फुटपाथवर कार्यालये थाटणे, दुकानांच्या जागांचा वापर, पॅसेजमध्ये शेतमालाची विक्री किंवा अनधिकृत बांधकामांसारख्या विषयांवर माहिती अधिकाराच्या माध्यमातून दबाव निर्माण करून आर्थिक तडजोडी केल्या जात असल्याच्या तक्रारीही चर्चेत आहेत. अर्थात, या आरोपांची स्वतंत्र चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारांमुळे माहिती अधिकारासारख्या महत्त्वाच्या कायद्याची प्रतिमा मलिन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पदोन्नतीसाठी पत्र विरोधासाठी राजकीय शिष्टमंडळ!
मुंबई APMCमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय या हस्तक्षेपाचे ठळक उदाहरण ठरत आहे. एका उपअभियंत्याला पदोन्नती मिळावी यासाठी बाजार समितीशी संबंधित संघटनेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाला पत्र दिले जाते. दुसरीकडे, त्याच पदोन्नतीला विरोध करण्यासाठी संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ सचिवांकडे पोहोचते आणि विरोधाचे पत्र देते. मग पदोन्नतीचा निर्णय नेमका कोणाच्या हातात आहे? संबंधित कर्मचाऱ्याची पात्रता, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल आणि प्रशासकीय नियम महत्त्वाचे की राजकीय शिफारशी? हाच प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षा विभागातील काही सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठीही तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. पदोन्नती आणि बदलीसारखे संवेदनशील निर्णय हे सेवा नियम व पात्रतेच्या आधारे होणे अपेक्षित असताना बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप वाढत असेल, तर प्रशासनाच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.
कारवाई केली की अधिकाऱ्यांवर RTIचा मारा!
बाजार समितीतील एखाद्या विभागप्रमुखाने अनियमिततेवर कारवाई केली, नियमबाह्य कामांना विरोध केला किंवा अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली की संबंधित विभागात माहिती अधिकाराचे अर्ज दाखल होऊ लागतात, असा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे आणि माहिती मागविणे हा नागरिकांचा अधिकार आहे. मात्र, कारवाई थांबविण्यासाठी किंवा वैयक्तिक दबाव निर्माण करण्यासाठी या कायद्याचा वापर होत असेल, तर तो गंभीर प्रशासकीय प्रश्न आहे.   गेल्या १० ते १५ वर्षांपासून अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. परिणामी, नियमांनुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही निर्णय घेताना बाहेरील दबावाचा विचार करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा वातावरणात अनधिकृत कामांवर कारवाई कोण करणार आणि प्रशासनाची जबाबदारी कोण पार पाडणार?
बाजारात १० ते १२ तथाकथित RTI कार्यकर्त्यांचा वावर?
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरातून येणारे सुमारे १० ते १२ तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ते बाजार समितीच्या विविध विभागांमध्ये अर्ज दाखल करीत असल्याची चर्चा आहे.
अभियांत्रिकी विभाग, बांधकामे, स्वच्छता, शौचालये, बदल्या, पदोन्नती आणि बाजार समितीच्या मालमत्तांशी संबंधित माहिती मागविण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जाते.
एकाच विषयावर वेगवेगळ्या नावांनी अर्ज दाखल होतात का? एकाच माहितीची पुनरावृत्ती किती वेळा होते? अर्जदारांनी मिळालेल्या माहितीचा पुढे कोणत्या कारणासाठी वापर केला? माहिती मिळाल्यानंतर अपील मागे घेण्यामागे काही तडजोडी झाल्या का? या सर्व बाबींची नोंद तपासण्याची गरज आहे.
तत्कालीन सचिव जरे यांनी माहिती आयुक्तांकडे केली होती तक्रार!
या प्रकाराची गंभीरता लक्षात घेता मुंबई APMCचे तत्कालीन सचिव शरद जरे यांनी कोकण विभागाच्या माहिती आयुक्तांकडे एका तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या कामकाजाबाबत पत्रव्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती एकाच विषयावर वारंवार अर्ज आणि अपिले दाखल करून प्रशासनाच्या कामकाजात अडथळे निर्माण करीत असल्याचा ठपका या पत्रातून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. संबंधित व्यक्तीला त्रासदायक व्यक्ती म्हणून घोषित करण्याबाबत तसेच तिच्या वारंवार अर्जांमुळे होणाऱ्या प्रशासकीय अडचणींची दखल घेण्याबाबतही पत्रात विनंती करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याने यापुढे कोणत्याही विषयावर माहिती मागविणार नसल्याचे बाजार समितीला पत्र दिल्याची माहिती आहे. मात्र, सचिव बदलल्यानंतर पुन्हा स्वतःच्या तसेच इतर व्यक्तींच्या नावाने माहिती अधिकार अर्ज दाखल केले जात असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबधित कार्यकर्तेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भूमिकेनंतरही APMC प्रशासन गाफील?
माहिती अधिकाराच्या नावाखाली होणाऱ्या कथित ब्लॅकमेलिंगच्या प्रकारांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात चिंता व्यक्त केली होती. एकाच विषयावर अनेक जण माहिती अधिकाराचे अर्ज दाखल करतात. प्रत्येक अर्जाला स्वतंत्र उत्तर देताना सरकारी यंत्रणेचा वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे एका अर्जावर दिलेली माहिती आणि त्याचे उत्तर सार्वजनिक करण्याची व्यवस्था निर्माण करण्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले होते. अशा व्यवस्थेमुळे एकाच विषयावर पुन्हा पुन्हा अर्ज करण्याची गरज कमी होईल आणि संबंधित माहिती इतर नागरिकांनाही उपलब्ध होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
मात्र, मुंबई APMCमध्ये अशा प्रकारची माहिती सार्वजनिक करण्याची व्यवस्था कितपत कार्यान्वित आहे? वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत का? विभागनिहाय RTI अर्ज आणि त्यांची उत्तरे सार्वजनिक केली जातात का? याची माहिती प्रशासनाने बाजार घटकांसमोर ठेवण्याची गरज आहे.
विकासकामे बाजूला प्रशासन अर्ज आणि दबावात अडकले!
मुंबई APMCमध्ये आज अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छता, शौचालयांची दुरवस्था, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, पॅसेजमधील अतिक्रमणे, वाहनांसाठी धक्के, पुनर्विकास आणि वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प यावर ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, शेतमालाची साठवणूक आणि बाजारपेठेचे आधुनिकीकरण यावर भर देण्याची गरज आहे. बाजार समितीचे उत्पन्न वाढविणे आणि व्यापारी, शेतकरी, माथाडी कामगार तसेच ग्राहकांना चांगल्या सुविधा देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असायला हवे.
परंतु अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि विभागीय कारवाईत बाहेरील हस्तक्षेप वाढत असेल, तर प्रशासनाचा वेळ विकासकामांऐवजी स्पष्टीकरणे, अर्ज आणि तक्रारींच्या उत्तरांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम बाजारातील सर्वसामान्य घटकांवर होतो.
पणन मंत्री ,अध्यक्ष-सचिवांनी लक्ष देणे गरजेचे आहे
राज्याचे पणन मंत्री व   मुंबई APMCचे अध्यक्ष जयकुमार रावल यांच्यासमोर आता केवळ महसूलवाढ किंवा पायाभूत सुविधांच्या विकासाचेच आव्हान नाही, तर बाजार समितीच्या प्रशासकीय स्वायत्ततेचे संरक्षण करण्याचेही मोठे आव्हान आहे. सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदल्यांसाठी स्पष्ट निकष निश्चित करावेत. राजकीय शिफारशी किंवा बाहेरील दबावाऐवजी सेवा नियम आणि पात्रतेनुसार निर्णय व्हावेत. बाजार समितीच्या विविध विभागांमध्ये दाखल होणाऱ्या RTI अर्जांचा आणि त्यावरील उत्तरांचा विभागनिहाय आढावा घेऊन वारंवार मागविण्यात येणारी माहिती सार्वजनिक करावी.
तसेच, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, फुटपाथवरील कार्यालये, दुकाने आणि पॅसेजमधील अनधिकृत शेतमाल विक्री याबाबत समान निकष लावून कारवाई करावी. माहिती अधिकाराचा खऱ्या जनहितासाठी वापर करणाऱ्या नागरिकांना संरक्षण मिळाले पाहिजे परंतु कायद्याच्या नावाखाली धमकी, आर्थिक मागणी किंवा बेकायदेशीर तडजोडी होत असल्याचे आणि या सर्वांच्या पाठिंबा देणारे ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुरावे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
कारण मुंबई APMC हा कोणत्याही राजकीय पक्षाचा, संघटनेचा किंवा तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा खासगी अड्डा नाही. हा शेतकरी, व्यापारी, माथाडी कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी चालणारा राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार आहे. येथे प्रशासनावर नियंत्रण कायद्याचे आणि नियमांचे असले पाहिजे दबावगटांचे नाही!