BREAKING: देशातील प्रवासी रेल्वे 12 मे पासून सुरु होणार, रेल्वेचा मोठा निर्णय

21
0
Share:

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये मोठा निर्णय घेतला आहे (Central Government decide to start passenger railway ). रेल्वे विभाग 12 मेपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वेगाड्या सुरु करणार आहे. सुरुवातीला 12 मे रोजी 15 गाड्या (30 फेऱ्या) सुरु होतील. या रेल्वे गाड्यांसाठी 11 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. रेल्वेच्या (irctc) अधिकृत वेबसाईटवर आणि अॅपवर यासाठी तिकीट बूक करता येणार आहे. यामुळे देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

12 मे रोजी सुरु होणाऱ्या रेल्वे गाड्या विशेष रेल्वे म्हणून सुरु होतील. नवी दिल्ली (दिबरुगड), आगरताळा, हावरा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिंकदराबाद, बंगळुरु, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तवी या रेल्वे स्टेशनचा यात समावेश आहे. त्यामुळे देशभरात अडकून पडलेल्या प्रवाशांना या ठिकाणांहून आपल्या गावाच्या दिशेने प्रवास करता येणार आहे.
यानंतर रेल्वे विभाग आणखी रेल्वे मार्गांवरही गाड्या सुरु करण्यावर निर्णय घेणार आहे. हा निर्णय उपलब्ध रेल्वे डब्यांवर घेतला जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी देशभरात कोविड 19 केअर सेंटरसाठी 20 हजारहून अधिक रेल्वे डबे आरक्षित केले आहेत. या व्यतिरिक्त देशभरातील स्थलांतरित कामगारांच्या वाहतुकीसाठी ‘श्रमिक विशेष’ रेल्वे म्हणून जवळपास 300 रेल्वे सुरु करण्याचीही तयारी सुरु आहे. त्यामुळेच या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन अन्य मार्गांवर रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे विभाग निर्णय घेणार आहे.

तिकीट बुक कसं करणार?

या प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी 11 मे रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून तिकीट बुकिंग करता येणार आहे. रेल्वे विभागाची अधिकृत वेबासाईट https://www.irctc.co.in/ वर कुणालाही तिकीट बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या काऊंटर होणारी गर्दी लक्षात घेते देशभरातील रेल्वे काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. अगदी प्लॅटफॉर्म तिकिट देखील ऑनलाईनच घ्यावं लागणार आहे. त्यासाठीही रेल्वे स्टेशनवर व्यवस्था नसेल.

ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट असणार आहे त्यांनाच रेल्वे स्टेशनवर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवाशांना चेहऱ्याचा मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच रेल्वे प्रवासाला सुरुवात होण्याआधी प्रत्येक प्रवाशाची तपासणी देखील होणार आहे. कोरोनाची लक्षण नाही अशाच प्रवाशांना प्रवासाला परवानगी मिळणार आहे. सुरु होणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक लवकरच रेल्वे विभागाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

Share: