Coronavirus effect: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरात 82 कोटीहून अधिक लोक उपाशी पोटी,

23
0
Share:

कोरोनामुळे घडणाऱ्या ‘या’ 11 घटनांनी जगभरात एक आढावा

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरुच आहे कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच इतरही अनेक मोठे बदल जगभरात पाहायला मिळत आहेत. एकूणच जगभरात उलथापालथ झाल्याचं दिसत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. काही देशांनी वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालवधी आणखी वाढवला आहे. याच पार्श्वभूमीवर जगभरात घडत असलेल्या घडामोडींचा एक आढावा .

. वटवाघुळांमुळे कोरोना पसरल्याची शंका काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असतानाही इंडोनेशियातील एका भागात वटवाघुळांची जोरात विक्री सुरु आहे. उत्तर इंडोनेशियाच्या टोमोहोन मार्केटमध्ये काही तासातच विक्रिला आलेले सर्व वटवाघुळ विकले गेले. इंडोनेशियात सध्या 8 हजारांहून जास्त कोरोनाबाधित आहेत. असं असलं तरी वटवाघूळच्या माध्यामातून माणसात कोरोना संसर्ग होतो का यावर शास्त्रज्ञांमध्ये दोन विरोधी मतं आहेत. अद्याप यावरील अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

. जगभरात बनावट माल दिल्यानंतर चीननं आता आपली खराब प्रतिमा सुधारण्याची धडपड सुरु केली आहे. चीनमध्ये काही हजार दुकानांवर छापे टाकून एकूण 9 कोटींच्या आसपास बोगस मास्क जप्त करण्यात आला आहे. स्पेन, नेदरलँड, भारत, पाकिस्तान, इटली, कॅनडा या सर्व देशांनी चीनी वस्तूंबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आता चीनमधील प्रत्येक कंपनीला परदेशात माल निर्यात करताना मालाच्या दर्जाबाबत लेखी हमी द्यावी लागत आहे.

. विषाणूंना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांप्रमाणेच जागतिक स्तरावरची एक मोठी संघटना उभी केली जावी, असं आवाहन मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी केलं आहे. जर एखाद्या प्रयोगशाळेत संशोधनाच्या आडून विषाणू तयार होत असतील, तर त्यावर एका जागतिक संघटनेची नजर असणं गरजेचं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.

. दक्षिण अफ्रिकेच्या नौदलाने चीनचे मासेमारी करणारे 6 जहाजं जप्त केली आहेत. चीनचे 6 जहाज दक्षिण अफ्रिकेच्या समुद्र हद्दीत विनापरवानगी शिरले होते. त्या सहाही जहाजांना दंड लावण्यात आला आहे. द हिंदूनं ही बातमी दिलीय. विशेष म्हणजे मासेमारी करण्यासाठी आलेल्या जहाजांमध्ये एकही मासा आढळून आला नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

. युरोपात कोरोनामुळे सर्वात आधी लॉकडाऊन होणाऱ्या इटलीत आता 4 मे पासून काहीशी सूट दिली जाणार आहे. मोठे उद्योग आणि कारखान्यांना सुरु करण्याची परवानगी दिली जाणार आहे. मात्र छोटी दुकानं आणि रेस्टॉरंट अजूनही बंदच राहणार आहेत.

. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा मिसाईल चाचणीवेळी जखमी झाल्याचा किंवा त्याला चक्क कोरोना झाल्याचा दावा आता पुढे येऊ लागला आहे. मात्र ठोस माहिती कुणाकडेही नाही. दरम्यान, दक्षिण कोरिया सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि तेथील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी किम जोंग यांच्या मृत्यूच्या बातमीचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तसेच किम जोंग यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

. चीनमध्ये बिजिंग आणि शांघाय येथील काही कॉलेज आणि शाळा पूर्वीप्रमाणे उघडल्या आहेत. चीनचं वुहान लॉकडाऊन झालं तेव्हा संपूर्ण चीन लॉकडाऊन झालेला नव्हता. मात्र देशभरात काही प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आले होते. सध्या वुहानमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही, असा दावा चीनने केला आहे.

. जगात सध्या अंदाजे 82 कोटी लोक उपाशी पोटीच झोपत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राच्या खाद्य प्रमुखांनी दिली आहे. श्रीमंत आणि प्रगत देशांनी ही उपासमार टाळण्यासाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. जर कोरोनाला लवकर आटोक्यात आणलं नाही, तर मोठ्या प्रमाणात लोक भुकबळीचे शिकार होण्याचीही भीती त्यांनी वर्तवली आहे.

. अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे जागतिक आरोग्य संघटनेला लाखो मास्क आणि कोरोनाच्या टेस्टिंग किट दान करणार आहेत. आपल्या अकाऊंटवरुन त्यांनी 10 लाख मास्क आणि 10 लाख टेस्टिंग किट देण्याचं जाहीर केलं आहे.

. फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 22 हजारांच्या पुढे गेली आहे. फ्रान्स जगातील चौथा देश आहे, जेथे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे फ्रान्समध्ये आतापर्यंत 4 लाख 63 हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 1 लाख 62 हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.

. इस्राईलमध्ये लॉकडाऊन आणि इतर नियमांतून काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. सध्या तिथं 15 हजारांहून जास्त कोरोनाबाधित आहेत. आणि 201 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Share: