खानदेशात चारा प्रश्‍न गंभीर

28
0
Share:

खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या चाराटंचाईसंदर्भातील स्थिती गंभीर बनली आहे. आणखी उन्हाळ्याचे पूर्ण अडीच महिने जायचे आहेत. चारा महागला असून, दुधाळ पशुधनाला पुरेसा व सकस चारा उपलब्ध करून देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. प्रशासनाने चारा मुबलक असल्याचे चुकीचे अहवाल दिल्याने चारा छावण्यांबाबत किंवा दावणीला चारा पुरवठ्याबाबत धुळे, जळगावात कार्यवाही सुरू झाली नाही. याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

खानदेशात सद्यःस्थितीत सुमारे ५५ हजार टन चारा उपलब्ध असल्याचे दावे प्रशासन करीत आहे. परंतु स्थिती नेमकी उलटी आहे. चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, बोदवड, जामनेर, धरणगाव, जळगावचा दक्षिण भाग, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री आणि नंदुरबारमधील नंदुरबार, धडगाव, अक्कलकुवा भागात चारा पुरेसा नाही. दादर(ज्वारी)चा कडबा यंदा ११ हजार रुपये प्रतिएकर या दरात मिळत आहे. मक्‍याचा कडबा अजून उपलब्ध झालेला नाही.

खरिपातील पिकांचा चारा संपला आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव, मुक्ताईनगरमधील तापीकाठी केळी व इतर पिकांची शेती असल्याने शेतकरी चाऱ्याची समस्या दूर करू शकतात. परंतु या भागातही चारा महाग आहे. दुधाळ पशुधनाचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण पशुखाद्याचे पोते १२०० रुपयात मिळते. म्हशीच्या दुधाला खासगी खरेदीदार ४२ रुपये तर गायीच्या दुधाला २० रुपये दर देतात. चारा, मजुरी व पशुखाद्यातच पैसा संपतो. नफा राहतच नाही, असे दुधाळ पशुधनाचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी दावणीला चाऱ्याची मागणी शेतकरी करीत होते. परंतु दावणीला चारा किंवा छावण्या सुरू करण्यासंबंधी चाराटंचाई असणे व तसा प्रशासनाचा अहवाल तयार करणे आवश्‍यक असते. परंतु जिल्ह्यात चाराटंचाईच नाही, असा अहवाल प्रशासनाने मध्यंतरी दिला. यामुळे कुठेही दावणीला चारा किंवा छावणी सुरू करण्याची कार्यवाही झाली नाही, असा दावा शेतकरी, संघटना करीत आहेत

Share: