सरकारने शेतकरी चळवळी दडपल्याः जयाजीराव सूर्यवंशी

19
0
Share:

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या असताना फडणवीस सरकारकडून कायद्याचा गैरवापर करून शेतकऱ्यांची आंदोलने चिरडली जात आहेत. आमच्यावर गुप्तहेर सोडले असून, फोन टॅपिंगदेखील सुरू आहे, असे खळबळजनक आरोप किसान क्रांतीचे राज्य समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी केले आहेत.

एक जून २०१७ मध्ये किसान क्रांतीने राज्यव्यापी संप केला होता. त्या वेळी सरकारबरोबर झालेल्या चर्चेत सात एकराच्या आतील शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा निर्णय झाला होता. सरकारने दीड वर्षात मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी फसवणूक केली, असे श्री.सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे.

फसवणूक सांगण्यासाठीच आम्ही पुन्हा २६ जानेवारीला सिंदखेडराजा येथी कर्जमुक्ती जागर यात्रा काढली. १९ फेब्रुवारीला आम्ही शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन यात्रेचा उद्देश सांगणार होतो. मात्र, पोलिसांनी आदल्या दिवशीच ३५३ कलमान्वये गुन्हे दाखल केले. आंदोलन हाणून पाडले. माझ्या ४० वर्षांच्या आंदोलनाच्या इतिहासात अशी गळचेपी मी अनुभवली नाही, असे ते म्हणाले.

मुलींचे आंदोलन चिरडले
कर्जमुक्तीसाठी वडीलधाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुलींनी पुणतांबा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. मात्र, ४०० पोलिसांची फौज आणून सरकारने ते देखील आंदोलन मोडले. गुन्हा नसतानाही शेतकरी कुटुंबांतील मुलींच्या वडिलांना पोलिस कोठडीत डांबले. न्यायालयाने या प्रकारावर ताशेरे ओढले आहेत, असे ते म्हणाले. पुणतांब्याचे शेतकरी आंदोलन, एसटी संप, अंगणवाडी कर्मचारी संप, मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन, बाबा आढाव किंवा अण्णा हजारे यांचे उपोषण अशी सर्व आंदोलने सरकारने मोडून काढली. खा. राजू शेट्टी व आ. बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल सरकार घेत नाही. ही अघोषित आणीबाणी आहे. यामुळे चळवळी संपतील. शेतकरी अजून संकटात येईल, असा आरोपही श्री.सूर्यवंशी यांनी केला.

ओटीएस योजना धूळफेक
किसान क्रांतीबरोबर झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी आणि दीड लाखाच्या वरील रक्कम वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) भरल्यास दीड लाखाची माफी देण्याचे सरकारने घोषित केले होते. प्रत्यक्षात कर्ज काढून ओटीएसचे पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांना माफी दिली नाही. ही धूळफेक आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री खोटे दावे करतात, असाही आरोप श्री. सूर्यवंशी यांनी केला.

Share: