फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखच्या मदतीला धावले आमदार प्रताप सरनाईक

*फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखच्या मदतीला धावले आमदार प्रताप सरनाईक*

*अस्मा शेख हिला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार ; आ. सरनाईक 

मुंबई : मुंबईतील फूटपाथवर राहून दहावी उत्तीर्ण झालेल्या अस्मा शेखच्या यशाची बातमी समजल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कठीण परिस्थितीवर मात करत अस्माने दहावीमध्ये यश संपादन केले असून तिच्या मदतीला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे धावले आहेत. तिला पुढील शैक्षणिक वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करण्यासह तिला राज्य सरकारकडून हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत , त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.काल दहावीचा निकाल जाहीर झाला. ९५ ते १०० टक्के गूण मिळवणारे अनेक विद्यार्थीही पहायला मिळाले. पण मुंबईच्या फूटपाथवर राहून व कठीण परिस्थितीत संघर्ष करून परीक्षेत ४० टक्के गूण मिळवणा-या अस्मा शेखचे यश अधिक लक्षवेधी आहे. तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. आज तिचे अभिनंदन करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी तिला फोन करून तिचे विशेष कौतुक केले. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी प्रताप सरनाईक यांनी दाखवली. पण त्याआधीच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे अस्मा हिने सांगितले. अस्मा शेख हिला आवश्यक ते पुढील सर्व सहकार्य करू असे सरनाईक यांनी सांगितले आहे. आम्हाला हक्काचे घर मिळावे , अशी अपेक्षा तिने आमदार सरनाईक यांच्याकडे बोलताना व्यक्त केली.

त्यावर आपण राज्याचे मुख्यमंत्री नगरविकास मंत्री तसेच गृह निर्माण मंत्री यांच्याकडे पाठपूरावा करून mmrda किंवा म्हाडा कडून अस्मा शेख हिला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सरनाईक म्हणाले. तसेच कॉलेज करून पार्टटाइम जॉब करायचा असेल तर मुंबईत फोर्ट भागात नोकरी मिळवून देण्याचा शब्द सरनाईक यांनी दिला. त्यावर अस्मा शेख हिनेही कॉलेज करून पार्ट टाइम नोकरी करण्याची तयारी दर्शवली आहे. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या अनेक नागरिकांना mmrda च्या योजनेत घरे देण्यात आली आहेत. त्याचपद्धतीने कठीण परिस्थितीत संघर्ष करून यश मिळविणाऱ्या व सर्वांपुढे आदर्श निर्माण करणाऱ्या अस्मा शेख हिला राज्य सरकारकडून घर मिळवून देण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत , असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर फूटपाथ हेच तिचे घर. ना काही आडोसा ना डोक्यावर छप्पर..फूटपाथवर अंथरलेला प्लास्टिकचा कागद आणि त्यावरच वर्षानुवर्षे सुरू असलेली आयुष्याची लढाई. स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अभ्यास. रस्त्यावर स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात तिने अभ्यास केला आणि यश मिळवले. तिने संघर्ष केला पण शिक्षण घेण्याची जिद्द मनात कायम ठेवली. तिचा हा संघर्ष इतर सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे , असे सरनाईक यांनी सांगितले. काबाडकष्ट करून आजच्या सर्वसामान्य तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावा असा संघर्ष तिने केला. स्वतः शिकत आहे आणि तिने इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
अस्मा शेखच्या या संघर्षातून सर्व सुखसोयी असतानाही कूरकूर करणा-या विद्यार्थ्यांनी धडा घेण्याची गरज आहे. रस्त्यावर राहणा-या आसमाचे ४० टक्क्यांचे हे यश निश्चितच ९० टक्क्यांहून कमी नाही. तिला मार्क्स किती मिळालेत हे महत्वाचे नाही, पण या परिस्थितीतही शिक्षण घेण्याची जिद्द तिने मनात कायम ठेवली , प्रयत्न केले हे महत्वाचे असून तिला पुढील वाटचालीत आवश्यक ते सहकार्य करू , असे सरनाईक म्हणाले.

रस्त्यावर लिंबू सरबत विकणाऱ्या आपल्या वडिलांना फूटपाथवरून स्वत:च्या घरात न्यायचं तिचं स्वप्न आहे. आणि त्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करू असा शब्द सरनाईक यांनी दिला आहे.