ब्रिटन मधुन भारतात नव्या कोरोनाचा शिरकाव, 6 जणांना नव्या कोरोनाची लागण

8
0
Share:

एकीकडे नव्या वर्षाच्या स्वागताची सर्वत्र उत्सुकता लागलेली असताना कोरोनाच्या नव्या प्रकार भारतात दाखल झाल्याने चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात कहर केला असतानाच आता भारतातही नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमधून भारतात परतलेल्या ६ जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या सर्व ६ जणांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच या ६ जणांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले असून, अन्य सहप्रवाशांचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनहून सुमारे ३३ हजार प्रवासी भारतात आले असून, सर्वांची तपासणी करण्यात आली.
यातील ११४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर देशभरातील सुमारे १० प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले असून, यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांचा समावेश आहे.  ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकाराचा फैलाव ७० टक्के जलदरित्या होतो. आतापर्यंत जगभरातील १६ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झाला आहे. नव्या प्रकारच्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहेत.

 

 

Share: