Nmmc Budget 2020-21,नवी मुंबई महापालिकेचा ३ हजार ८५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

5
0
Share:

नवी मुंबई– नवी मुंबई महापालिकेचा वर्ष २०२०-२१ साठी ३ हजार ८५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी स्थायी समितीमध्ये सादर केला. कोणतीही करवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात विशेष कोणतीही नवीन कामे न घेता जुनी कामे पूर्ण करण्यात येणार आहे. या वेळी २०१९-२० चा सुधारीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
या अर्थसंकल्पात विविध उत्पन्नाच्या स्त्रोतातून ३ हजार ८५० कोटी रुपये जमा, तर ३ हजार 850 कोट रुपये विविध विकासकामांवर व्यय होणार आहे. स्थानिक संस्थाकरातून १ सहस्र १२५ कोटी, मालमत्ता करातून ६३० कोटी, विकासशुल्कातून १२५ कोटी, पाणीपट्टीतून ११५ कोटी, केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत योजनांतून १६० कोटी जमा होणे अपेक्षित आहे. त्याच प्रमाणे नागरी सुविधांवर ९८७ कोटी, प्रशासकीय सेवांना ६३८ कोटी, पाणीपुरवठा आणि मलनि:सारण यासाठ ५८० कोटी, उद्यान आणि मालमत्तांसह इतर नागरि सुविधांसाठी ३८९ कोटी, स्वच्छ महाराष्ट्र आणि घनकचरा व्यवस्थापन, क्षेपणभुमी सुविधासाठी ४२९ कोटी, आरोग्य सेवेसाठी १६६ कोटी, शिक्षण विभागावर १५२ कोटी असा एकूण ३ सहस्र ८४८ कोटी रुपये व्यय होणे अपेक्षित आहे.
२०२०-२१ या वर्षात नेरूळ येथे चिल्ड्रन पार्क बांधण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहर गतीमानतेच्या उपाययोजनांमध्ये वाशी सेक्टर १७ महात्मा फुले चौक ते कोपरी उड्डाण पुलापर्यंत उन्नत मार्ग बांधणे, घणसोली ते ऐरोली पामबीच रस्त्यावर पूल बांधणे, अग्रोळी तलाव ते कोकण भवनपर्यंत पूल बांधण्यात येणार आहे. नेरूळ येथे सायन्स पार्क बनवण्यासाठी ८७ कोटी रुपये, वाशी सेक्टर १२ येथे १२४ कोटी रुपयांचा तरणतलाव, नेरूळ सेक्टर ३८ येथे वृद्धाश्रम बांधणे, शहर सुरक्षेसाठी १ सहस्र ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याठी १५४ कोटी रुपयांचा व्यय करण्यात येणार आहे. नेरूळ आणि ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालये पूर्णक्षमतेने चालू करण्यासाठी कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणेे आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे खरेदी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटिव्ही बसवणे, कातकरीपाडा (रबाळे) येथे कनिष्ठ महाविद्यालय चालू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे अल्प करण्यासाठी शाळांमध्ये लॉकर तयार करणे, बालवाडी ते १० वी पर्यंत डिजिटल शिक्षण पद्धती राबवण्यात येणार आहे.

Share: