Oil price: खाद्यतेल आयातशुल्कात कपात केल्यास देशांतर्गत बाजारात शेतमालाचे दर कमी होण्याची शक्यता

13
0
Share:

केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कामध्ये कपात केली तर देशांतर्गत बाजारात सोयाबीन, भुईमूग आणि मोहरी या शेतमालाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसू शकतो. त्यामुळे आयातशुल्क कपात करण्याचा विचार रद्द करावा, अशी भूमिका शेतमाल बाजार विश्‍लेषक, जाणकारांनी मांडली आहे. बऱ्याच वर्षानंतर यावर्षी सोयाबीन, मोहरी आणि भुईमूगाला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे.

सध्या बाजारात सोयाबीन ३६०० रुपयांपासून ४३०० रुपयांपर्यंत विकले जात असून. मोहरीला यावर्षी ६१०० रुपयांच्यापुढे दर मिळाला आहे. त्यामुळे सरकारवर हमीभावाने खरेदी करण्याचा असलेला आर्थिक ताण हा कमी होणार आहे. खाद्यतेलात स्वयंपूर्ण होण्याचे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्टदेखील साध्य होईल. परंतु जर केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्क कपात केली तर त्याचा परिणाम देशांतर्गत तेलबिया दरावर होईल, आणि सरकारने केलेल्या मुक्त शेतमाल बाजारच्या कायद्याला हरताळ फासला जाईल, अशी टीका शेतमाल बाजार विश्‍लेषक, जाणकारांनी केली आहे.

देशांतर्गत खाद्यतेलाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर तर मिळत असून आयातशुल्क जास्त असल्याने सरकारलाही जास्त उत्पन्न मिळत आहे. देशात आत्तापर्यंत तेलबियांचे दर कमी असल्याने शेतकरीही कमी लागवड करत होते. परिणामी खाद्यतेल आयातीवरील आपले अवलंबित्व हे ७० टक्क्यांपर्यंत गेले आहे. तेलबिया दरवाढीने शेतकऱ्यांना लागवडीस प्रोत्साहन मिळेल आणि नविन यंत्रसामग्री वापरही शक्य होईल.

Share: