करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद

20
0
Share:

*करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद*

*दहावी, बारावी व विश्वविद्यालयांच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार होणार*

नवी मुंबई :करोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला असून यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा आणि बालवाड्या, अंगणवाड्या तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचेमार्फत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
तथापि शासन निर्देशानुसार या कालावधीत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात असेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या कालावधीत आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी असेही सूचित करण्यात आले आहे.
तरी याची दखल सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालय, बालवाडी, अंगणवाडी संस्थांनी घ्यावी असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने स्पष्टपणे सूचित करण्यात येत आहे.

Share: