तंत्र भुईमुग लागवडीचे

58
0
Share:

भुईमुग हे एक तेलबिया वर्गातील महत्वाचे पिक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के तेलासाठी, 10 टक्के प्रक्रिया करून खाणे व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रथिने (25 टक्के) आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फळबागांची लागवड तसेच कापसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये आंतरपीक घेऊन उपलब्ध जमिनीचा पुरेपूर वापर करता येणे शक्‍य आहे.

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने तीन हंगाम आहेत. खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या अधिक असते. मात्र उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते.महाराष्ट्रात खरीप हंगामातील भुईमुगाखालील लागवडीखालील क्षेत्र साधारणत: 2.36 लाख हेक्टर, तर उन्हाळ्यात 0.425 लाख हेक्टर एवढे असते. खरिपात भुईमुगाची उत्पादकता साधारणत: 1,000 ते 1,100 किलो प्रति हेक्टर असते तर उन्हाळ्यात साधारणत: 1,400 ते 1,450 किलो प्रति हेक्टर एवढी असते. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे तसेच वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.

जमीन: 

भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त 12-15 सें.मी. एवढीच राखावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते. तसेच भुईमुगाच्या लागवडीसाठी भुसभुशीत जमिनीची निवड करावी कारण भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. तसेच शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.

हवामान:

भुईमुग हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. मात्र पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे व फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान साधारणत: 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

Share: