कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांच दिल्लीत आंदोलन; दिशा ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांची चर्चा

Share:

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीत ३७ व्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी शेतकरी संघटनांनी दिल्ली-हरयाणाला जोडणाऱ्या सिंघू सीमेवर येथे बैठक घेतली. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटना दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करीत आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये सोमवारी ४ जानेवारीला चर्चेची पुढची फेरी होणार आहे.

शेतकरी या दोन्ही मागण्यांवर ठाम आहेत. या चर्चेत केंद्र सरकारचे दोन मंत्री आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी हजर होते. या आधी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेच्या सहा फेऱ्या पार पडल्या परंतु त्यातून काहीही निष्पन्न होऊ शकलेले नाही. ९ डिसेंबर रोजी चर्चेची सहावी फेरी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेनंतर कोणताही तोडगा न निघाल्याने थांबवण्यात आली होती. बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा कायदा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले.
परंतु तिन्ही कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्द्यांवर कोणताही तोडगा निघू शकला नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सिंघू, गाझीपूर, टिकरी आदी प्रवेशद्वारांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. राजधानीत ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी पऱ्यायी मार्ग निवडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी राजस्थानातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी राजस्थान-हरयाणा सीमेवर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवरून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

Share: