रोटा व्हायरस लसीचा नियमित लसीकरणात समावेश

10
0
Share:
रोटा व्हायरस लसीचा नियमित लसीकरणात समावेश
 

      मूल जन्माला आल्यापासून विविध लसीकरणाच्या माध्यमातून पालकांप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिकाही बालकाची काळजी घेण्याचे काम करीत असल्याचे सांगत नवी मुंबईचे महापौर श्जयवंत सुतार यांनी अतिसारामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी रोटा व्हायरस लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असल्याचे मत व्यक्त केले.

      अतिसारामुळे होणारे बालकांचे कुपोषण टाळणे तसेच अर्भक मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण सुरु केले असून या लसीकरणांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दरवर्षी साधारणत: 22 हजार बालकांना रोटा व्हायरस लस देण्यात येणार असून अतिसार विरोधी मोहिमेच्या शुभारंभ नवी मुंबईचे महापौर  जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते शिरवणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्महावीर पेंढारी, उपआयुक्त  अमोल यादव, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी  दयानंद कटके, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी, ठाणे  अरुण काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

      यावेळी बोलताना महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांनी अतिसारामुळे होणारे बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हाती घेण्यात आलेला हा रोटा व्हायरस लसीकरणाचा कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत असून प्रत्येक पालकाने आपल्या बालकासाठी या लसीकरणाचा न चुकता लाभ घ्यावा असे आवाहन केले. नागरी आरोग्य केंद्राचे अधिक अद्ययावतीकरण करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी यापुढील काळात अधिक गतिमान प्रयत्न करण्यात येतील असेही ते म्हणाले.

      पुर्वी रोटा व्हायरस लस खाजगी वैद्यकीय आरोग्य केंद्रात देण्यात येत होती. मात्र त्यासाठी खर्च मोठया प्रमाणावर येत असल्याने अत्यंत महत्वाची अशी ही रोटा व्हायरस लस  महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत दिली जाणार आहे.

       रोटा व्हायरसमुळे होणारा धोका वयाच्या पहिल्या दोन वर्षामध्ये अधिक आढळून येतो. त्यामुळे ही लस बालकांना सहा आठवडे, दहा आठवडे, चौदा आठवडे अशी तीन वेळा देण्यात येणार आहे. ही लस सुरक्षित असून तोंडावाटे दिली जाते.

      तरी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या मोफत लसीकरण सत्रामध्ये नव्याने समावेश झालेल्या रोटा व्हायरस लसीकरणाचा लाभ सर्व पालकांनी घेऊन आपल्या मुलांना लसीकरण करुन घ्यावे व बालकांमध्ये अतिसाराच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यास सहाय्य करावे असे आवाहन नवी मुंबईचे महापौर श्जयवंत सुतार व महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share: