जानेवारी महिन्यात मराठवाडय़ात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

36
0
Share:

कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना विविध योजनांच्या आधारे मदत केली जात असली तरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जानेवारी महिन्यात ६७ एवढी झाली आहे. एका बाजूला तीव्र दुष्काळ असतानाही आत्महत्यांची कारणे शोधून अनुदानासाठी पात्र प्रकरणांचा निपटारा या महिन्यात केलाच गेला नसल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्हय़ात सहा प्रकरणांची छाननी करण्यात आली. मात्र, अन्य एकाही जिल्हय़ात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणाची छाननीसाठीची बैठकही घेतली गेली नसल्याची आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी कळविली आहे.
गेल्या दहा वर्षांतील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: २०१४ पासून यातील वाढ लक्षणीय आहे. २०१४ मध्ये ४३८ एवढा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा होता. त्यानंतरच्या वर्षांत अनुक्रमे ८३१, ७५९, ७७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खरेतर कर्जमाफीच्या योजना लागू झाल्यानंतर आत्महत्यांचा आकडा कमी होईल, असे या क्षेत्रातील व्यक्तींना वाटत होते. मात्र, कर्जमाफी योजनेमध्ये टाकण्यात आलेल्या अटी आणि ग्रीन लिस्ट येण्यास लागलेला विलंब यामुळे आत्महत्यांचे सत्र काही थांबले नाही. या वर्षी पहिल्याच महिन्यात ६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील दोन आत्महत्या वगळता अन्य ठिकाणी या प्रकरणाचा निपटारा करणाऱ्या समितीची बैठकच झाली नसल्याचे दिसून येत आहे. या वर्षांत बीडमध्ये सर्वाधिक १७ आत्महत्या झाल्या, तर उस्मानाबादमध्ये १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Share: