पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठा

विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल ४५ तालुक्यांपैकी ३० तालुक्यांत टंचाईच्या झळानी ग्रासले आहे. विभागातील ३८३ गावे २६६० वाड्यांमधील टंचाई भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी ४१५ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. विभागातील आठ लाखांहून अधिक लोकसंख्येला तर ४४ हजार जनावरांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणीपुरवठ्यासाठी २२३ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली.

पाण्याचा उपसा वाढल्याने भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्राेत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीटंचाई असून, समारे २ लाख ४५ हजार, सांगलीतील सुमारे २ लाख ५० हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७७ हजार, पुणे जिल्ह्यातील १ लाख ६१ हजार लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक १ लाख ६४ हजार तर माण तालुक्यातील मधील १ लाख ६ हजार नागरिकांना टंचार्इच्या झळा बसत आहे. तर सातारा जिल्ह्यातील ४३ हजार ८७६ जनावरांनाही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील टंचाई भीषण झाल्याने ११५ गावे ३९७८६२ वाड्यांना ११७ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर सांगली जिल्ह्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून, ११५ गावे ७८२ वाड्यांना ११० टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. साताऱ्यातील ९३ गावे १०५ वाड्यांना १०५ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील ४८ गावे ५३५ वाड्यांमध्ये ८३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. सांगलीतील जत तालुक्याच्या सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथील ६३ गावे ४९६ वाड्यांना ६८ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे, तर माण, आटपाडी, सांगोला तालुक्यांमध्येही टंचाई चांगलीच वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अद्यापही टंचाई भासत नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले