सांगलीत ७३ लाख टन उसाचे गाळप

4
0
Share:

जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी ७३ लाख २४ हजार ३०० टन उसाचे गाळप करून ८७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. ११.९७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. यंदा एक कोटी टनांपर्यंत गाळप होण्याची शक्यता आहे. एक कोटी क्विंटलच्या पुढे साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे, असा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला आहे. ऊस उत्पादकांना ७५ टक्के एफआरपीची रक्कम वर्ग केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यंदाचा गाळप हंगाम अजून महिनाभर तरी चालणार आहे. या कालावधीत गाळपाची आकडेवारी ९० ते ९५ लाख टनांपर्यंत जाणार आहे. गतवर्षीच्या हंगामात सुमारे १ कोटी साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाही एक कोटीच्या आसपास साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. वसंतदादा, विश्वास क्रांती, सोनहिरा, हुतात्मा आणि राजारामबापू या साखर कारखान्यांनी गाळपात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गाळपास आलेल्या उसाची एफआरपीनुसार १०० टक्के रक्कम दिली जाते आहे. सध्या सोळा कारखान्यांनी ८० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित एफआरपीची रक्कमही कारखानदारांकडून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

यशवंत, माणगंगाची धुराडी बंद

नागेवाडी येथील यशवंत आणि आटपाडी तालुक्यातील माणगंगा या साखर कारखान्यचा हंगाम बंद झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मोहनराव शिंदे कारखान्याचे गाळप बंद होईल. जिल्ह्यात अजूनही २० टक्के ऊस गाळपासाठी शिल्लक आहे. त्यामुळे या महिनाअखेर गाळप चालेल, असा अंदाज साखर कारखान्यांकडून व्यक्त होत आहे.

Share: