बुलडाण्यात कापसाचा भाव सहा हजार पार

19
0
Share:

बुलडाणा : कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या पश्चिम विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी निसर्गाने नुकसानीत लोटले. तोच कापसाच्या भावानेही आवश्यक त्यावेळी मंदी निभावल्याने जवळपास शेतकऱ्यांचा कापूस हा ५२०० ते ५३०० रुपये प्रति क्विंटलने यापुर्वी विक्री झाला आहे. आता कमी अधिक शिल्लक असलेल्या जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील कापसाला नुकताच सहा हजारी पार भाव मिळत आहे. त्यामुळे कमी शेतकऱ्यांना या वाढलेल्या भावाचा फायदा होणार असल्याचे चित्र आहे.

शेतकरी हा आशावादी व भाव न घेणाराच प्राणी ठरला असल्याने भावाची वाढती अपेक्षा ही त्याच्यासाठी आतापर्यंत नुकसान करणारीच ठरली आहे. सध्या कापसाला ग्रामीण भागात ६ हजार १०० रुपयांचे भाव असून, कमी राहिलेल्या कापसालाच हे भाव आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग हा आजही पार खचून गेला आहे. नांदुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन शेतकरी घेत असले, तरी मागील वर्षीच्या बोंडअळीमुळे यावर्षी पाहिजे त्याप्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीला जवळ न करता सोयाबीन पिकाकडे मोर्चा वळविला. पण त्यातूनही उत्पन्न कमी मिळाले.

सोबतच आवश्यक भाव मिळाला नसल्याचे शल्य आहे. कापसाच्या वाढत्या दराचा फायदा घेता न आल्याने हा वर्ग चिंतेत पडला आहे. कापूस हा सहा हजारी पार किती दिवस राहणार हे अनिश्चित अाहे. तरी भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी या भावानेही कापूस देण्याच्या नक्कीच मनस्थितीत नाही हे सद्या तरी दिसून येत आहे.

Share: