नगर दक्षिणमधून लढण्याचा रघुनाथदादांना आग्रह

25
0
Share:

राज्याच्या राजकारणात गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला आहे. बुधवारी नगरला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत याबाबत एकमुखी मागणी झाली. त्यामुळे विखे, पवारांमुळे चर्चेत राहिलेला या मतदारसंघात नव्या चर्चेचा सूर मिसळू लागला आहे. रघुनाथदादा पाटील याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात १९९१ साली माजी खासदार स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्यात लढत झाली होती. त्यावेळचे निवडणूक प्रकरण न्यायालयात गेले होते. त्याच निवडणुकीपासून निवडणूक अचारसंहिता लागू झाली. त्यामुळे २८ वर्षानंतरही विखे-गडाख लढतीचे किस्से लोक सांगतात. यंदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादीने जागा सोडली नाही, त्यामुळे सुजय विखेंना भाजपात जावे लागले. गेल्या महिनाभरापासून हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत आहे.

आता या मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होऊ लागला आहे. नगर येथे झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय महाराज बारस्कर, आम आदमी पार्टीचे राजाभाऊ आघाव, शेतकरी युवा आघाडीचे बच्चू मोढवे, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास कदम, जिल्हा कार्याध्यक्ष अहमदभाई जहागीरदार, कैलास पाटील, मनोज हेलवडे, बाळासाहेब कदम, अनिल भापकर यांच्यासह कार्यकर्यांनी त्यांना आग्रह केला.

Share: