एशिया पॅसिफिक परिषदेत रेशीमचे सादरीकरण

5
0
Share:

ॲग्रीकल्चर आणि इन्सेक्‍ट टेक्‍नॉलॉजीविषयीची सहावी एशिया पॅसिफिक परिषद २ ते ४ मार्चदरम्यान कर्नाटकातील म्हैसूरमध्ये पार पडली. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत महाराष्‍ट्रातील रेशीमचा झपाट्याने होत असलेला विस्तार, त्याला महारेशीम अभियान व मनरेगाची मिळालेली साथ याविषयीचे सादरीकरण करण्यात आले.

चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारतासह एकूण १९ देशांच्या २५० शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला. जागतिक स्तरावर रेशीमविषयक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याची देवाणघेवाण होण्याच्या दृष्टीने या परिषदेचे विशेष महत्त्व आहे. देशातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र, मणिपूरसह महाराष्‍ट्रातील दहा शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी झाले. यामध्ये जागतिक स्तरावर रेशीम ऊत्पादन सद्यःस्‍थिती, आढावा, बदलत्या वातावरणात रेशीम उत्पादन टिकवणे व वाढविणे, रेशीम तुती नर्सरी, तुती चहा, जी. आय. तंत्रज्ञानाद्वारे व जैविकद्वारे तुती कीड नियंत्रण आदीबाबत शोधनिबंध व सादरीकरण करण्यात आले.

महाराष्‍ट्रातील शिवाजी विद्यापीठ येथील डॉ. ए. डी. जाधव यांच्यासह यांच्या कन्या तेजस्‍विनी व आश्वीनी जाधव यांनी ”रेअरिंग हाउस व मलबेरी” चहा याविषयीचा शोधनिबंध सादर केला. रेशीमचे नागपूरस्थित मुख्य कार्यालयातील उपसंचालक दिलीप हाके यांनी ”महारेशीम अभियानामुळे रेशीमशेतीमध्ये महाराष्ट्रात झालेली वाढ” याविषयावर सादरीकरण केले.

सहभागी देशातील रेशीमची नेमकी स्थिती, आपल्या देशाला त्यानुषंगाने नेमकी संधी काय, याशिवाय रेशीमधील ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती होण्याच्या अनुषंगाने ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरली, असे राज्याचे रेशीमचे उपसंचालक हाके यांनी सांगितले.

Share: