अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातील आहे – शरद पवार

7
0
Share:

अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातील आहे – शरद पवार

राज्यातील राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. एका रात्रीत अजित पवारांनी बंड करून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य काय? आणि त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील पत्रकार परिषदेत खुलासा केला.

शरद पवार म्हणाले, अजित पवार यांची भूमिका पक्षविरोधी आहे, जे कोणी आमदार त्यांच्यासोबत राजभवनात गेले, त्यांना कोणतीही पुसटशी कल्पना नव्हती. देशात पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला आहे हे अनेकांना माहित नसावे. त्यामुळे नंतर आम्ही योग्य ती कारवाई करु.
भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करु.

अजित पवार काय कारवाई करणार? यावरून शरद पवार म्हणाले, हा निर्णय एकट्याने होत नाही. पक्षाच्या बैठकीत त्यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार याचा निर्णय केला जाईल, पण निश्चित कारवाई केली जाईल. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य तिथे गेल्याचे समजले. मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवारांनी घेतली. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातील आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात सक्षम सरकार स्थापन होण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. बहुमताचा आकडा तिन्ही पक्षांकडे होता. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ अशी संख्या होती. शिवसेनेला काही अपक्षांनीही साथ दिली होती. १७० च्या आसपास आमची आमदार संख्या जात होती. काल आमची बैठक पार पडली. या बैठकीत काही प्रश्नांबाबत चर्चा राहिली होती.

Share: