Apmc News:अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु, पाणी ओसरणार

22
0
Share:

बेळगाव – कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा (Almatti Dam) फुगवटा दूर करण्यासाठी जास्तीचा विसर्ग करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनुसार कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी 5 लाख क्युसेक्सने विसर्ग (Almatti Dam) करण्याचे आदेश दिले. अलमट्टी धरणातून हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीचं पाणी महाराष्ट्रात कमी होऊन सांगलीतील पूर ओसरण्यास मदत होणार आहे.

कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. या धरणातून पुढे पाणी न सोडल्याने कृष्णा नदीने थैमान घातलंय. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनंती केली होती. लवकरच सांगलीतील पूर ओसरण्याची अपेक्षा आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पथकं वाढवली

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ, राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्डचे पथकं तैनात आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत आहे.

एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 एवढ्या पथकांचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मीच्या एका पथकाचा समावेश आहे.

मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. कोल्हापूर आणि सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे.

कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच आणि एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी

कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्तेवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

Share: