apmc news:’भाजपला 250 जागा तर आम्ही 28 जागांवर गोट्या खेळू काय?’ राज ठाकरेंचा घणाघात

21
0
Share:

मुंबई : ‘भाजपचे लोक प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या किती जागा निवडून येतील, याचा आकडा सांगतात. यांना इतका आत्मविश्वास येतो कुठून? आताही भाजपचं कोणीतरी म्हणालं आहे की आमच्या 250 जागा निवडून येतील. भाजपच्या इतक्या जागा निवडून येणार तर आम्ही काय उरलेल्या जागांवर गोट्या खेळायच्या का?’ असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट केलं आहे.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या नेहमीच्या शैलीत तोफ डागली. ‘ज्यादिवशी महाराष्ट्रावर या भाजपच्या लोकांचा वरवंटा फिरेल तो मराठा ब्राह्मण, माळी किंवा धनगर म्हणून नाही तर मराठी म्हणून फिरेल. तेव्हा भाजपला समर्थन देणाऱ्यांना कळेल,’ असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे:

– लोकसभा निवडणुकीत यांनी ठरवलं होतं की शिवसेनेच्या चार सिनियरला नेत्यांना पाडायचं. कारण त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं नव्हतं. निकालही तसेच आले.

– ईव्हीएमच्या चिप अमेरिकेतून येतात. त्यात आधी काय फिड केलयं ते कसं कळणार? निवडणूक आयोगाला याबाबत उत्तर मागितलं. पण ते उत्तर त्यांच्याकडे नाही. न्यायालयात गेला तर न्याय मिळणार नाही.

– आरटीआयमधून माहिती मिळणार नाही. वृत्तपत्रांकडूनही माहिती मिळणार नाही. निवडणूक आयोगाकडून मिळणार नाही. न्यायालयाकडून न्याय मिळणार नाही. मी बोललो होतो की पत्रकारांना दिसेल पण बोलता येणार नाही. कारण सरकार सर्वांची गळचेपी करत आहे.

– आधी हे तुम्हाला आकडे सांगतात. मग पुलवामा घडतं आणि त्यानंतर तुम्हाला खरं वाटू लागतं.

– यांचं काम असं आहे की जे त्यांच्यासोबत जाणार नाही त्याला संपवायला आणि ज्यांच्या चोपड्या तयार आहेत त्यांना आपल्याकडे घेतात.

– मी ममतांना भेटायला गेलो. तेव्हा लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगाली गाणी लागली होती. मराठी गाणी आमच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये लागतील का?

– देश डबघाईला आला आहे. अनेक कंपन्या बंद झाल्या. जेट एअरवेज बंद पडली. वाहन निर्मिती क्षेत्रात घट आहे. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिती तर 10 लाख लोक बेरोजगार होतील. गेल्या काही वर्षातली उच्चांकी बेकारी आहे.

– महाराष्ट्रात दीड लाख कंपन्या बंद पडल्या, देशातल्या 60 लाख छोट्या मोठ्या कंपन्या बंद पडल्यात आहेत.

Share: