विधानसभा निवडणूक 2019 । अखेर विधानसभेची तारीख ठरली,21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला मतमोजनी

20
0
Share:

दिपाली बोडवे :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलेलं आहे. विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा  जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 आणि हरियाणातील 90 विधानसभेच्या जागांसाठी निवडणुकांचं वेळापत्रक घोषित करण्यात आलं. दोन्ही राज्यांत एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बरोबर एक महिन्याने म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत.

महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा पथक गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तैनात असणार आहे. तर सर्व पोलिंग बूथवर सीसीटीव्हीची नजर असेल. दिव्यांग आणि वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मुंबई आणि सहकारी बँकांवर निवडणूक आयोगाची विशेष नजर असेल. महाराष्ट्रामध्ये दोन विशेष अधिकारी खर्च सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. उमेदवारांना प्रत्येकी 28 लाख रुपये खर्चाची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना तीस दिवसांचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे.

प्रचारकाळात सोशल मीडिया आणि फेसबुकवर संपूर्ण नियंत्रण असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी एक पथक महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.

प्रचारामध्ये प्लास्टिकच्या वापराला बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणस्नेही सामग्रीचा वापर करणं उमेदवारांना बंधनकारक करण्यात आलं आहे.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

 • भाजप – 122
 • शिवसेना – 63
 • काँग्रेस – 42
 • राष्ट्रवादी – 41
 • बविआ – 03
 • शेकाप – 03
 • एमआयएम – 02
 • वंचित/भारिप – 01
 • माकप – 01
 • मनसे – 01
 • रासप – 01
 • सपा – 01
 • अपक्ष – 07
 • एकूण – 288

2014 मध्ये विभागनिहाय कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी 19, इतर 04

विदर्भ (62) – भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी 01, इतर 03

मराठवाडा (46) – भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी 08, इतर 03

कोकण (39) – भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी 08, इतर 06

मुंबई (36) – भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी 00, इतर 02

उत्तर महाराष्ट्र (35) – भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी 05, इतर 02

एकूण (288) – भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी 41, इतर 20

 

Share: