BIG BREAKING:अजित पवारांच्या गौप्यस्फोट,’राष्ट्रवादी आणि भाजपचं आधीच ठरलं होतं’

6
0
Share:

मुंबई:राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी भाजपला पाठिंबा देण्याबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत. अजित पवारांनी बारामतीच्या कार्यकर्त्यांसमोर आपण भाजपला का पाठिंबा दिला याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट  केले आहेत. भेटायला गेलेल्या कार्यकर्त्यांनी ही एक्स्क्ल्युझिव्ह माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.

राष्ट्रवादीनं काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र आता मोठे नेते खोटे पाडत आहेत, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडे केला.

मला खोटं पाडण्याचा प्रयत्न पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय हा काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकाही झाल्या होत्या, मात्र मला आता शब्द फिरवायला सांगितला जातोय, असं अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना सांगितलं.

महाविकास आघाडीत अडीच वर्षे शिवसेनेचा तर अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असा निर्णय झाला होता, मात्र शेवटच्या बैठकीत शब्द फिरवण्यात आला, ज्यामध्ये पाच वर्ष पूर्ण सेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच अडीच वर्षांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार असं ठरलं, असंही अजित पवारांनी सांगितलं.

गुप्त मतदार झाले तर आपण जिंकणार, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. मला आमच्या नेत्यांकडून गप्प बसायला सांगितले जात आहे, पण वेळ आल्यावर सर्व बोलणार, असा इशारा अजित पवारांनी दिला.

केंद्रात भाजपचे भक्कम सरकार आहे, त्यांच्याकडून आपल्याला निधी मिळणार म्हणून सेनेपेक्षा भाजपसोबत जाणे योग्य असणार आहे, असं म्हणत अजितदादांनी परतीचे दोर कापल्याचं स्पष्ट केलं.

सुप्रीम कोर्टात सुनावणी 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर  महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात झाली. देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजूने आणि विरोधात असे जवळपास दीडतास युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने विश्वासदर्शक ठरावाचा निर्णय मंगळवारी 10.30 पर्यंत राखीव ठेवला आहे. विश्वासदर्शक ठराव तातडीने होणार की नाही याचा  निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे.

Share: