भाजपची नवीन राजकीय चाल

18
0
Share:

भाजपची नवीन राजकीय चाल

  • सत्तास्थापनेस नकार देऊन शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेची समीकरणे जुळविण्यासाठी भाग पाडण्यामागे भाजपची राजकीय चाल असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेला धर्मनिरपेक्ष काँग्रेसचा पाठिंबा कधीही मिळणार नाही, असे भाजपला वाटत आहे. त्यातून शिवसेनेला धडा मिळेल आणि पुन्हा सत्तेचा सारीपाट मांडता येईल, अशी भाजपला आशा आहे. कोणतेही सरकार स्थापन न झाल्यास किंवा महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यास ते अल्पकालीन राहण्याची शक्यता असल्याने पुन्हा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यात रथयात्रेचीही आखणी भाजप करीत आहे.

शिवसेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा हट्ट न पुरविण्याचा चंग भाजपनेही बांधला असून सत्तास्थापनेसही नकार दिला.
शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेचे समीकरण जुळविता न आल्यास ते पुन्हा भाजपकडे पाठिंबा मागतील आणि त्यासाठीच युती तोडली असल्याचे शिवसेनेने जाहीर केलेले नाही. शिवसेना अद्यापही रालोआतील घटकपक्ष असून केंद्र सरकारमध्ये सहभागी असल्याने त्यांना अजूनही भाजपबरोबरचा ‘स्नेहबंधनाचा’ धागा टिकवून ठेवायचा आहे, असे भाजपला वाटत आहे.
फेरनिवडणुकी सह तयार

शिवसेनेचेही सत्तास्थापनेचे प्रयत्न असफल झाल्यास राष्ट्रपती राजवटीखेरीज पर्याय असणार नाही आणि वर्षभराच्या आतच पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, यादृष्टीनेही भाजपने आखणीला सुरूवात केली आहे. रथयात्रा आणि राज्यभरात जनजागृती सभा-मेळावे घेण्याच्या दृष्टीने सोमवारपासून बैठकांचे सत्र सुरु होईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले. काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी महाजनादेश यात्रा काढली होती, त्याच धर्तीवर पुन्हा यात्रेचे नियोजन केले जाईल, असे संबंधितांनी सांगितले.

Share: