गावातील रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार

गावातील रस्त्याची दुरुस्ती न केल्यास लोकसभा निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. चिखलगाव ते लाडज दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चिखलगाव ते लाडज मार्गावर पूल किंवा बंधारा बांधण्याची नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, या मागणीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हतबल झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात ग्रामसभेत घेण्यात आलेला ठराव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना पाठवून आपला रोष व्यक्त केला. चिखलगाव ते लाड या मार्गाने पावसाळ्यात वाहतूक प्रभावित होते. रुग्णांना उपचारासाठी नेणेदेखील अडचणीचे ठरते. गंभीर रुग्णांसाठी एेनवेळी नावेचा आधार घ्यावा लागतो. मात्र, एखादेवेळी नावाडी हजर नसला तर रुग्णांसह नागरिकांना मानसिक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे भविष्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी येथे पूल बांधावा, अशी मागणी आहे.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पूल बांधण्याचे आश्वासन दिले जाते. त्यानंतर मात्र ते हवेतच विरते, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे. या वेळी मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास लोकसभा निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे. शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना याविषयी निवेदन दिले. त्यामध्ये लाडजच्या सरपंच ऊर्मिला भुरके, उपसरपंच भोजराज नंदागवळी, चिखलगाव सरपंच पुष्पा धांडे, उपसरपंच प्रभू राऊत, माजी सरपंच दौलत गुरुनुले, भास्कर राऊत, प्रा. अमृत नखाते, भास्कर नाकतोडे व इतरांचा समावेश होता.