BREAKING: नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली,अभिजित बांगर नवे आयुक्त

8
0
Share:

*नवी मुंबई मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली,अभिजित बांगर नवे आयुक्त

*करोना संकटात राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या,

नवी मुंबई: राज्य सध्या करोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची अखेर बदली झाली आहे. नागपूरचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याआधी अण्णासाहेब मिसाळ यांची झालेली बदली दुसऱ्या दिवशी थांबवण्यात आली होती.
‘कोविड’मुळे नवी मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांना नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते. अशात मिसाळ यांची बदली करण्यासाठी निवडणूक आयोगाची मंजुरी आवश्यक होती. परंतु आता मिसाळ यांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला.
नवी मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अण्णासाहेब मिसाळ यांची बदली झाल्याची चर्चा होती. नवी मुंबईचा कोरोनाबधितांचा आकडा वाढत आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात बदलीचे आदेश निघाल्यानंतर दोनच दिवसात (25 जून) ही बदली रद्द झाली होती.
अण्णासाहेब मिसाळ यांची जुलै 2019 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या जागेवर बदली झाली होती. मिसाळ यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात निर्माण झालेला दुरावा दूर करून संवाद वाढवला. तसेच रामास्वामी यांनी राबवलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मिसाळ यांना महापालिकेची सूत्रे स्वीकारुन काही महिने न उलटले तोच कोरोनासारख्या आजाराने शहरात शिरकाव केला.
मिसाळ यांना निवृत्त होण्यासाठी काही वर्षे शिल्लक असल्यामुळे त्यांना नवी मुंबई महापालिका नियुक्ती देण्यात आली होती. मिसाळ यांना महापालिकेत जेमतेम एक वर्ष होत आले होते.

अभिजीत बांगर यांची नियुक्ती

तुकाराम मुंढे यांच्याआधी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या अभिजीत बांगर यांची अण्णासाहेब मिसाळ यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. मागील चार महिन्यात त्यांची दुसऱ्यांदा बदली झाली. मात्र, दोनच दिवसात त्यांचीही नियुक्ती अधांतरी राहिली होती.

यंदाच्या जानेवारी महिन्यापर्यंत बांगर हे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा कारभार सांभाळत होते. मात्र त्यांच्या जागी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महिनाभर बांगर यांच्याकडे कोणतेही खाते नव्हते. फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग संचालक म्हणून अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळे शेवटी नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

आता जेमतेम चार महिन्यात पुन्हा त्यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी सांभाळले होते, आता तिथेच बांगर यांची बदली झाली होती

कोण आहेत अभिजीत बांगर?

2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी
युवा आणि धडाडाचे सनदी अधिकारी म्हणून ओळख
नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2020 असे 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम
14 महिन्यात कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला
फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून बदली झाली, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता
अखेर नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली
नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली, मात्र अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रखडल्याने बांगर यांची बदलीही अधांतरी
जुलै 2020 मध्ये अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली

Share: