Breaking: राज्यात आमचे नाही ,शिवसेनेचे सरकार,कथित ऑडिओ क्लिपमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांची खदखद?

21
0
Share:

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नसून शिवसेनेचे सरकार असल्याची भावना काँग्रेस नेत्यांच्या मनात असल्याचं चित्र आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यकर्त्यासोबत कथित संभाषणाची ध्वनिफीत  एका वृत्त वहिनीच्या हाती लागली आहे.

पृथ्वीराज चव्हाण आणि एका व्यक्तीमधील दूरध्वनीवरील संवाद यामध्ये ऐकू येतो. स्थानिक भागासाठी निधीच्या अपेक्षेने त्या व्यक्तीने पृथ्वीराज चव्हाण यांना फोन केला होता.

“मी मंत्रीमंडळात नाही. पण शिफारस करेन. आमचं सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन. पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे होईल असा वाटत नाही. निधी सगळा परत घेतला आहे. कोरोनाच्या लढ्यामध्ये निधी सगळा परत घेतला आहे” असे पृथ्वीराज चव्हाण यांचे समोरच्या व्यक्तीला सांगणे होते. “तुमचं नाव मोठं आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे” असं कार्यकर्ता म्हणाला असता “जेव्हा होती संधी, तेव्हा दिली नाही” अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी खदखद व्यक्त केल्याचं कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतं.

राज्यातील नेतृत्वाकडे प्रशासकीय कौशल्याचा अभाव असल्याचे आढळते, असे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अलीकडेच पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर आपल्या बोलण्यातून चुकीचा अर्थ काढला गेल्याचा दावाही त्यांनी केला होता.

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत सहावी जागा लढण्याचा काँग्रेसचा हट्ट होता. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक न लढण्याचा निरोप बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवून काँग्रेसवर दबाव आणला. अखेर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनचे कारण देत काँग्रेसला सहाव्या जागेचा हट्ट सोडावा लागला होता.

मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही राज्यात पक्षावर अन्याय झाल्याची भावना काँग्रेस नेत्यांमध्ये होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाची पदे आणि खाती शिवसेना-राष्ट्रवादीकडे असल्याची काँग्रेस नेत्यांची पहिल्यापासून भावना आहे.

Share: