रत्नागिरी : बहिणींनी आपल्या राष्ट्रीय धावपटू असलेल्या एकुलत्या एक भावाला भाऊबीजेची भेट म्हणून बुलेट दिली. मात्र, बहिणींना भेट देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही या निराशेतून धावपटू भावाने गळफास घेत आत्महत्या  केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चंद्रकांत झगडे  असं या 26 वर्षीय धावपटूचं नाव आहे. दापोली तालुक्यातील लाडघर येथे ही घटना घडली.

चंद्रकांतला तीन बहिणी आहेत. त्यांनी भाऊबीजेनिमित्त आपल्या एकुलत्या एक भावाला बुलेट भेट दिली. मात्र, बहिणीला देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. आपण बहिणीला काहीही देऊ शकलो नाही याची त्याला खंत वाटली. त्यामुळे तो सकाळपासून घरच्यांशीही फारसा बोलला नाही. त्याचे वडील बाहेरगावी एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला गेले. मात्र, अर्ध्या तासातच मुलाने आत्महत्या केल्याची बातमी त्यांना कळाली. त्यानंतर त्यांना धक्का बसला. दुपारच्या वेळेत घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेऊन त्याने आत्महत्या केली.

धावपटू चंद्रकांत सुशिक्षित बेकार होता. त्याने पुणे येथील अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्याने गोल्डमेडल जिंकले आहे. त्याच्या जाण्याने अनेकांच्या जीवाला चटका लागला आहे. 3 बहिणींनी एकुलत्या एक भावाला बुलेट भेट दिली. मात्र, आता भाऊच नसल्यानं बहिणींनाही मानसिक धक्का बसला. भावाला दिलेली भाऊबीजेची भेट शेवटचीच ठरल्याचंही बोललं जात आहे. चंद्रकांतच्या खिशात चिट्टी आढळून आली आहे. यात त्याने आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असं लिहलं आहे. चंद्रकांतच्या अशा अचानक एक्झिटने अनेकांना चटका लावला आहे.