चेन स्नॅचिंगसाठी चोरट्यांचा आधुनिक फंडा, पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर प्लॅनिंग करुन चोरी.

19
0
Share:

मुंबई:फोनवर संभाषण, मेसेज, व्हाट्स अॅप मेसेज, फेसबुक चॅटिंगचा वापर करत चोरी केल्याच्या बऱ्याच घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांनी नामी शक्कल लढवत अनोख्या पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत . चेन स्नॅचिंगसाठी चोरट्यांनी चक्क पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर प्लॅनिंग करुन चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी चार चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोटारसायकल असा 3 लाख 12 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या सांगवी परिसरात सततच्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. अखेर याप्रकरणी एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं. या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर हे चोरटे पबजी गेम आणि इन्स्टाग्राममार्फत संपर्कात राहत असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून या टोळीने चेन स्नॅचिंगचे अशाप्रकारे सत्र सुरू ठेवलं होतं. जुनी-नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख या सांगवी पोलिसांच्या हद्दीत या टोळीने चेन स्नॅचिंगचा सपाटा लावला होता. विविध भागात राहणारे हे चोरटे रोज एकमेकांशी संपर्क साधत असे. इतकंच नव्हे तर पोलीस चौकशी करुन गेले की टोळीतील इतरांना ते माहिती देत असत. हे नेमकं कसं घडतंय? याबाबत पोलीसही विचार करत होते.

चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे सांगवीत महिला-तरुणी आणि नागरिकांचीही ओरड सुरु झाली होती. अशातच काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या सापळ्यात दोन चोरटे फसले. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र काही दिवसांनी पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला, पुन्हा तीच मेथड चोरटे अवलंबू लागले. मग आधी बेड्या ठोकलेल्या दोन्ही चोरट्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. चेन स्नॅचिंग कुठं, कशी आणि कधी करायची यासाठी कसं भेटायचं हा कट पबजी गेम आणि इन्स्टाग्रामवर रचला जायचा. इतकंच नव्हे तर एकाकडे पोलीस चौकशी करायला आलेत याची माहिती इतर सदस्यांना यावरुनच दिली जायची. पोलीस मोबाईल नंबरवरुन चोरट्यांचा माग काढतात, याची पूर्ण कल्पना असल्याने हा नवा आणि आधुनिक फंडा चेन स्नॅचिंगसाठी अवलंबला गेला. पण हाही फंडा पोलिसांनी खोडून काढला आणि अन्य दोन चोरट्यांना ही जेरबंद करत, या टोळीचा पर्दाफाश केला.

Share: