हरभरा बिजोत्पादन तंत्रज्ञान

54
0
Share:

कडधान्य पिकांमध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात घेतली जाते. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रात हरभरा लागवडीला जास्त प्राधान्य देण्यात येते. महाराष्ट्र राज्यात 2013 ते 14 मध्ये हरभरा पिकाखालील क्षेत्र 18.20 लाख हेक्टर होते. त्यापासून 16.22 लाख टन उत्पादन व उत्पादकता 891 किलो/हेक्टर एवढी होती.

हरभऱ्याची प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविणेसाठी आपणास सुधारित जातीच्या बियाण्यांचा वापर, योग्य लागवड पद्धतीचा अवलंब करणेही काळाची गरज आहे. अलिकडच्या काळात हरभऱ्याचे विकास, विश्वास, फुले-जी 12, विजय, विशाल, विराट, विहार, कृपा, दिग्विजययासारखी भरपूर उत्पादन देणारे आणि रोगप्रतिकारक नवनवीन सुधारीत वाण प्रसारित झालेली आहेत. सुधारित वाणांचा प्रसार होवून सुद्धा शेतकरी आपल्याकडीलच बियाण्यांचा पेरणीसाठी उपयोग करतात. अशा बियाण्यांची उगवणशक्ती, भौतिक शुद्धता आणि जोम कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सुधारित वाणांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हरभऱ्याचे अधिक उत्पन्न मिळेल. सुधारित वाणांमध्ये सुद्धा शुद्ध व दर्जेदार बियाणे वापरणे गरजेचे असते. सुधारित वाणांचा मागणी अभावी तुटवडा निर्माण झाल्यास बाजारात अशुद्ध बियाण्यांचा पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते. दुसर्‍यावर अवलंबून न राहता बिजोत्पादन कसे करावे यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

जमीन व हवामान:

मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 च्या दरम्यान असावा. हलकी अथवा भरड, चोपण, पाणथळ व क्षारयुक्त जमीन या पिकासाठी वापरु नये. स्वच्छ सुर्यप्रकाश, थंड व कोरडे हवामान या पिकासाठी चांगले मानवते. या पिकाच्या वाढीसाठी सर्वसाधारण 15 ते 25 अंश सेल्सिअस तापमान चांगले असते.

पूर्वमशागत:

खोल नांगरट कुळवाच्या दोन पाळ्या देवून जमीन भुसभुशीत करावी. खरीपात मूग व उडीदाचे पीक घेतले असल्यास काढणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देवून पेरणी करावी. शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी प्रति हेक्टरी 10-15 टन चांगले कुजलेले शेण खत किंवा कंपोस्ट जमिनीत मिसळावे.

पेरणी:

कोरडवाहू क्षेत्रात हरभर्‍याची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी. बागायती क्षेत्रासाठी पेरणी 1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. कोरडवाहू क्षेत्रात बियाणे 5 से.मी. खोलीवर बी पेरावे. पेरणी टोकण पद्धतीने अथवा पाभरीने करावी. पेरणीसाठी दाण्याच्या आकारमाना नुसार हेक्टरी बियाणे वापरावे. उदा. लहान दाण्याच्या वाणा करीता हेक्टरी 60 ते 65 किलो बियाणे वापरावे, मध्यम आकाराच्या वाणाकरीता 70 किलो बियाणे वापरावे तर टपोऱ्या आकाराच्या वाणाकरीता 100 किलो बियाणे वापरावे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर 30 से.मी. ठेवावे तर दोन झाडांमधील अंतर 10 से.मी. ठेवावे.

Share: