सोलापुरात ढोबळी मिरची, हिरवी मिरची तेजीत

24
0
Share:

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरची, हिरवी मिरचीची आवक तुलनेने कमी होत असल्याने आणि मागणी वाढत राहिल्याने त्यांच्या दरात या सप्ताहात चांगलीच तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज जेमतेम दोन ते पाच क्विंटल राहिली. तर, हिरव्या मिरचीची आवक २० ते ३० क्विंटलपर्यंत झाली. त्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने खूपच कमी होती. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांना मागणी वाढली आहे. विशेषतः बाहेरील मार्केटमधून सर्वाधिक मागणी आहे. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि कमाल ३००० रुपये, तर हिरव्या मिरचीला किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि कमाल ३५०० रुपये, असा दर मिळाला.

त्याशिवाय गवार, भेंडी यांच्या दरातील तेजीही या सप्ताहात पुन्हा कायम राहिली. त्यांची आवकही जेमतेम रोज १० ते १५ क्विंटल इतकी कमी राहिली. गवारला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि कमाल ३२०० रुपये, तर भेंडीला किमान १८०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि कमाल ४००० रुपये इतका दर मिळाला. वांगी, टोमॅटोचे दर स्थिर राहिले. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल १८०० रुपये, तर टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि कमाल १२०० रुपये, असा दर मिळाला.

Share: