नवी मुंबई पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान, उपक्रमाला नागरिकांचा  सकारात्मक प्रतिसाद!

6
0
Share:

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे.
नवी मुंबई पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना  शहरात स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाट, खतनिर्मिती यावर भर देण्यात आला आहे. नेरूळ विभाग कार्यालयाकडून सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात असून, या उपक्रमाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्याअनुषंगाने शहरात विविध कामे सुरू असून, शहरात स्वच्छतेबरोबर पर्यावरणाची जपणूक करण्याच्या अनुषंगाने कचऱ्याचे वर्गीकरण करणे. तसेच ५० किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निघणाऱ्या सोसायट्यांच्या आवारातच कंपोस्ट करून खतनिर्मिती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
त्याअनुषंगाने नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ विभागातील स्वच्छता
अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कचरा वाहतूक सुपरवायजर, कामगार आदींच्या माध्यमातून नेरूळ विभागातील सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिकेच्या या उपक्रमाला सोसायट्यांचे पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. काही सोसायट्यांमध्ये कंपोस्ट पिट बसविण्यासाठी जागेचा अभाव आहे अशा सोसायट्यांना आउटसोर्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता कायम राहणार असून, महापालिकेच्या डम्पिंग ग्राउण्डवरील कचऱ्याचा मोठा भार कमी होणार आहे तसेच कचरा वाहतुकीचा खर्चदेखील कमी होणार आहे.

Share: