अधिकचं खातं मिळत नाही तोपर्यंत मंत्र्यांची यादी देणार नाही,कांग्रेसच्या पावित्र्याने खातेवाटप रखडल.

22
0
Share:

मुंबई:ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील खातेवाटपाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काँग्रेसच्या आक्रमक पावित्र्यामुळे खातेवाटप रखडलं  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एक अधिकचं खातं मिळत नाही, तोपर्यंत आपल्या मंत्र्यांची यादी देणार नाही असा पवित्रा काँग्रेसने घेतल्याची माहिती मिळत आहे.  काँग्रेसमुळे सत्तास्थापना, मंत्रिमंडळ विस्तार यानंतर आता खातेवाटपही रखडल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकाआघाडी सरकारच्या खातेवाटपाबाबत काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. आणखी एक खातं मिळावं यासाठी काँग्रेस आग्रही आहे. जोपर्यंत अधिकचं एक खातं मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेस आपल्या मंत्र्यांची यादी देणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसला ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडणार खातं हवं आहे. ग्रामविकास किंवा कृषी खातं मिळावं यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र ग्रामविकास खातं सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे. तर दुसरीकडे कृषी खातं सोडण्यास शिवसेनेनेचाही इन्कार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली  आहे.

शिवसेनेने आपल्या वाट्यातील खातं काँग्रेसला द्यावं असा सल्ला राष्ट्रवादीने दिला आहे. यानुसार शिवसेना काँग्रेसला आणखी एक खातं देण्यास तयार झाली आहे. पण कृषीऐवजी परिवहन, वने किंवा जलसंधारण खाते देण्याची तयारी शिवसेनेची आहे. त्यामुळे या तीन खात्यांपैकी एक खाते स्वीकारण्यास काँग्रेस राजी होणार का हे पाहावं लागणार आहे.

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचं लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे. खातेवाटप आज होईल, उद्या होईल असं सांगत तारीख पे तारीख दिली जातं आहे. त्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. या सर्व मंत्र्यांना कोणते खातं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान महाविकासआघाडीतील पालकमंत्र्यांचा फॉर्म्युला मात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. यानुसार शिवसेनेला 13, राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 10 पालकमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ज्या पक्षाचे जितके आमदार आहेत, त्यानुसार प्रत्येक पक्षाला पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना (56) आणि राष्ट्रवादी (54) यांचे आमदार जवळपास समान असल्यामुळे दोघांना प्रत्येकी 13-13 पालकमंत्रिपदं मिळण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेसचे आमदार कमी (44) असल्यामुळे त्यांच्या वाट्याला 10 पालकमंत्रिपदं येऊ शकतात. खातेवाटपासोबतच पालकमंत्र्यांची नावं जाहीर होऊ शकतात.

Share: