Corona death | मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर

4
0
Share:

मुंबई:कोरोनाच्या कहर दिवसेंदिवस वाढले आहेत त्यामध्ये पोलीस आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारीही येत  आहेत. कोरोनाचा कहर वाढत असतानाच, मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता.

संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

राज्यात 96 पोलिसांना कोरोना

दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत 96 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 96 पोलिसांत 15 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली.

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे. राज्यात 23 मार्चपासून ते 22 मार्चपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी यामध्ये 11 पोलीस अधिकारी आणि 53 पोलीस शिपायांचा समावेश होता. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे 22 एप्रिलला एकाच दिवसात तब्बल 15 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यातील 96 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

वर्षा बंगल्यावरील महिला पोलिसाला कोरोना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं मागील आठवड्यात समोर आलं होतं.

केंद्रीय मंत्री आठवलेंच्या ताफ्यातील पोलिसाला कोरोना

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदास आठवले यांच्या मुंबईच्या वांद्रे येथील ‘संविधान’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी हा पोलीस कर्मचारी तैनात होता. हा कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून गावी गेला होता. या पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share: