भारतात चार दिवसात कोरोना लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष

9
0
Share:

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींनी महालसीकरण मोहिमेबाबत महामंधन केलं आणि यावेळी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली, ते म्हणाले की, “लसीकरणात कोणतंही VIP कल्चर चालणार नाही. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनाच लस दिली जाईल”. पंतप्रधान म्हणाले की, “महालसीकरण मोहीम यशस्वी करुन भारत जगासाठी एक उदाहरण बनणार आहे, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल.

भारतात कोरोनावरील लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ठ केंद्र सरकारनं ठेवलं आहे. यामध्ये 1 कोटी आरोग्य कर्मचारी आणि 2 कोटी फ्रंटलाईन वर्कर्स यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील नागरिक आणि 50 वर्षांखालील को-मॉर्बिट व्यक्तींना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 16 मंत्रालयांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, आपत्कालीन वापरासाठी अधिकृत केलेल्या दोन लसी भारतात तयार केल्या गेल्या आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताला लसीकरणाचा अनुभव, दुर्गम भागात पोहोचण्याची व्यवस्था कोरोना लसीकरणासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. 16 जानेवारीपासून आपण देशातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मोदी म्हणाले, सर्वात आधी फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येईल. त्यानंतर पोलीस कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा बलाच्या जवानांना लसीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील लोक आणि जे जास्त करून संवेदनशील आहेत, त्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

 

Share: