Coronavirus update| कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

5
0
Share:

-कोरोनाचा कहर, राज्यात दिवसभरात तब्बल 811 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 7,628 वर

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान सुरुच आहे , राज्यात आज तब्बल 811 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आज दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची संख्या 323 वर पोहोचली आहे. राज्यात आज 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 1 हजार 76 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे .(Maharashtra corona update)

राज्यात आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 13, पुणे महानगरपालिकेतील 4 तर मालेगाव, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, धुळे, सोलापूर येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर 6 महिला आहेत. यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील 11 रुग्ण आहेत. 8 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहेत. या 22 मृत्यूंपैकी 13 रुग्णांमध्ये ( 59 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

प्रयोगशाळा तपासण्या

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 8 हजार 972 नमुन्यांपैकी 1 लाख 1 हजार 162 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 7262 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात 1 लाख 25 हजार 393 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 8 हजार 124 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 555 कंटेन्मेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 8 हजार 194 सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी 31.43 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Share: