Devendra Fadnvish: केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला 19 हजार कोटी रुपये : देवेंद्र फडणवीस

4
0
Share:

 

मुंबई: राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (26 मे 2020) दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची आकडेवारीनुसार माहिती दिली. (Opposition Leader Devendra Fadnavis  Corona Lockdown)

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

केंद्राने जीडीपीच्या पाच टक्के कर्ज घेता येईल, अशी व्यवस्था केली, म्हणजे एकूण १० लाख ६९ हजार कोटी रुपये, त्यापैकी महाराष्ट्राला १ लाख ६० हजार कोटी रुपये कर्ज घेता येऊ शकतील
केंद्राने कायद्यात बसत नसतानाही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व पैसे दिले आहेत
केंद्र सरकारने गरिब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांना अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातंर्गत गरिबांना गहू, तांदूळ, डाळ मोफत दिला जातो. केंद्र सरकारने या तीन महिन्यात 1750 कोटी रुपयांचा गहू, 2620 कोटी रुपयांचा तांदूळ, 100 कोटी रुपयांची दाळ आणि स्थलांतरित मजुरांसाठी अतिरिक्त 122 कोटी रुपयांचं अन्नधान्य, असं एकूण 4592 कोटी रुपयांचं अन्नधान्य राज्याला दिलं आहे.
19 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून, याशिवाय 5747 कोटी कापूस खरेदीसाठी, 2311 कोटी तांदूळ खरेदीसाठी, 593 कोटी तूर खरेदीसाठी आणि 125 कोटी चणा-मका खरेदीसाठी, 403 कोटी पिक विम्याचे, एकूण 28104 कोटी केंद्राकडून
महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या, प्रत्येक ट्रेनमागे 50 लाख केंद्राला खर्च, राज्याने केवळ तिकिटाचे सात ते नऊ लाख खर्च केले
3800 कोटी रुपये महिला, विधवा, दिव्यांग अशा विविध घटकांच्या खात्यात थेट जमा
केंद्र सरकारचे गरीब कल्याण पॅकेज, 4 हजार 592 कोटींचे अन्नधान्य केंद्राने राज्याला दिले.
ठाकरे सरकार कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरत असल्याची टीका विरोधक वारंवार करत आहेत. भाजपने राज्य सरकारविरोधात दोनच दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन छेडले होते. काल भाजप नेते नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. कर्नाटक, मध्य प्रदेशमधील सरकार उलथवण्याचा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच हालचाली होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात रंगवला जात आहे.

दुसरीकडे, राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट ‘मातोश्री’ गाठलं होतं. हे वृत्त पसरल्यानंतर राजकीय भूकंपाचे संकेत मानले जाऊ लागले. अचानक राज्यपालांसोबत विविध पक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने चर्चांना उधाण आले आहे.

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत एकामागून एक ट्वीट करत ठाकरे सरकार मजबूत असल्याचा दावा करत आहेत. मात्र त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यात कोरोनाचं संकट घोंघावत असताना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये त्यांच्या मनात ठाकरे सरकारवरील खदखद व्यक्त होत असल्याची चर्चा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा सल्ला देणं किंवा महाविकास आघाडी तोडण्याची हीच वेळ असल्याचं सुचवणे, यामागील छुपे अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Share: