Solar Eclipse 2020| ग्रहणकाळात देशभरातील मंदिरे बंद, तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाईची मूर्ती सोवळ्यात,शिर्डीतील साईमंदिरातही ग्रहण पूजा.

3
0
Share:

ग्रहणकाळात देशभरातील मंदिरे बंद, तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाईची मूर्ती सोवळ्यात,शिर्डीतील साईमंदिरातही ग्रहण पूजा.

मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (रविवार 21 जून) सकाळी दहा वाजताच्या सुमारास लागले. हे शतकातले दुसरे सर्वात मोठे सूर्यग्रहण असून देशभरातील मंदिरे कालपासूनच बंद आहेत. चारधाम मंदिरे रात्री दहा वाजल्यापासून बंद असून तुळजाभवानी, विठ्ठल रखुमाई यांसह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख देवस्थानातील मूर्तीही ग्रहणकाळात सोवळ्यात ठेवण्यात येणार आहेत.

देशभरात सर्व मंदिरे कालपासूनच बंद ठेवण्यात आली आहेत. चार धाम मंदिरे रात्री दहा वाजल्यापासून बंद आहेत. तिरुपती बालाजीचे मंदिर काल रात्री 8.30 वाजल्यापासून बंद असून आज दिवसभर बंद राहील, तर भक्तांसाठी उद्यापासून खुले होईल.

तुळजाभवानीची मूर्ती सोवळ्यात ठेवली जाणार आहे. सकाळी 9.50 वाजल्यापासून मूर्ती सोवळ्यात ठेवण्याचे विधी सुरु झाले. सकाळी 10.08 ते दुपारी 1.37 या काळात मूर्ती सोवळ्यात असेल. ग्रहणानंतर देवीला पंचामृत स्नान आणि धुपारती केली जाईल.

विठ्ठल रखुमाईला सोवळ्यात ठेवण्याचा विधी
पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला साध्या पद्धतीने शाल पाघरुन सोवळ्यात ठेवले जाणार आहे. सकाळी ग्रहण स्पर्शापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत सोवळ्यात ठेवण्याचा विधी सुरु राहील. ग्रहण सुटल्यानंतर दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत स्नान घातले जाणार आहे. देवाचा महानैवेद्य दुपारी 11.30 वाजता असतो, तो आज ग्रहण सुटल्यानंतर 4 वाजून 30 मिनिटांनी दाखवला जाणार आहे. लॉकडाऊन असल्यामुळे मंदिरात भाविकांना प्रवेश नसणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अनुष्ठान करण्यात येत आहे. अनुष्ठान सुरु करण्याआधी देवीला स्नान घातलं गेलं. उत्सव मूर्तीसमोर संकल्प करुन अनुष्ठानाला सुरुवात झाली.

शिर्डीतील साईमंदिरातही ग्रहण पूजा करण्यात आली. साईमंदिरात साईसमाधीवर तुळशीपत्राचे आच्छादन ठेवून मंत्रघोष करण्यात आला.
ग्रहण सुटल्यावर साई मूर्ती आणि समाधीला मंगलस्नान होणार, तर नित्य बारा वाजेची माध्यान्ह आरती ग्रहण सुटल्यानंतर संपन्न होणार.

कणकदुर्गाचे मंदिर सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ग्रहणकाळ संपल्यानंतर मंदिराचे दरवाजे उघडणार आहेत. ग्रहणानंतर सर्व मंदिरांमध्ये अभिषेकपूजा केली जाणार आहे.

श्रीकलाहस्तीचे मंदिर खुले

श्रीकलाहस्तीचे मंदिर मात्र ग्रहणकाळातही खुले राहणार आहे. सकाळी 10.18 आणि 11.45 वाजता कलाहस्ती मंदिरात विशेष अभिषेक केला जात आहे. दर तासाला 300-400 भाविकांना दर्शन उपलब्ध राहील.
सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत असून काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडत आहे.

आषाढ अमावास्येचे हे ग्रहण ‘चूडामणी ग्रहण’ म्हणून ओळखले जाते. सूर्यग्रहणावेळी आकाशात 2 मीटर निळी रेखा दिसेल. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाचे मुख्य केंद्र असेल. डेहराडून, सिरसा व टिहरीत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल.

Share: