राज्यात होणार आठ लाख शौचालये

5
0
Share:

राज्य हागणदारीमुक्त झाल्याची सहा महिन्यांपूर्वीच शासनाकडून घोषणा करण्यात आली असली तरी अजूनही राज्यातील ८ लाख ३७ हजार २१४ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. शौचालय नसलेल्या आणि बेसलाईन सर्व्हेमध्ये नावे नसलेल्या कुटुंबांची पाणी व स्वच्छता विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात ही बाब स्पष्ट झाली. शौचालय नसलेल्या कुटुंबांची स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असून शौचालय बांधून घेतली जाणार आहेत.

ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये बांधून त्याचा वापर करावा यासाठी शासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी शासन १२ हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. शौचालय नसलेल्या कुटुंबांचे आठ वर्षापूर्वी सर्वेक्षण करून त्याची नावे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या संकतस्थळावर नोंदणी करुन बेसलाइन सर्व्हेच्या यादीत नावाचा समावेश झाला. गेल्या चार वर्षात यावर भर देऊन बेसलाइन सर्व्हेत नाव असलेल्या कुटुंबांनी शंभर टक्के शौचालय बांधली आणि राज्य हागणदारीमुक्त झाल्याची शासनाने घोषणा केली.

बेसलाइन सर्व्हेच्या यादीनुसार हागणदारीमुक्तीची घोषणा झाली असली तरी त्यात नावे नसलेल्या अनेक कुटुंबांकडे शौचालय नसल्याची बाब समोर आली. त्यानुसार गेल्या काही महिन्यात पाणी व स्वच्छता विभागाने सर्वेक्षण केल्यावर राज्यभरात ८ लाख ३७ हजार २१४ कुटुंबाकडे शौचालये नसल्याची बाब स्पष्ट झाली.

आता या कुटुंबांना अनुदान देऊन वैयक्तिक शौचालये बांधून घेतली जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर ८ लाख ३७ हजार २१४ कुटुंबांची नोंदणी केलेली असल्याचे सांगण्यात आले. नव्याने होणाऱ्या शौचालयात औरंगाबाद, बीड, नांदेड, जळगाव जिल्ह्यामध्ये संख्या अधिक आहे. ही शौचालये झाल्यावरच खरया अर्थाने राज्य हागणदारीमुक्त होणार आहे.

Share: