करोना व्हायरस संसर्गास प्रतिबंध करण्याकरिता महानगरपालिका स्तरावर शीघ्र कृती दलाची स्थापना

19
0
Share:

करोना व्हायरस संसर्गास प्रतिबंध करण्याकरिता महानगरपालिका स्तरावर शीघ्र कृती दलाची स्थापना.

-नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या मॉल्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, ए.पी.एम.सी. मार्केट अशा ठिकाणी नियमित स्वच्छता राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत

नवी मुंबई:   महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली करोना व्हायरस संसर्गाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करोना व्हायरस संसर्ग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी गरज असेल तरच प्रवास करावा, तसेच बाहेरगावी जाणारा प्रवास शक्यतो टाळणेबाबत सूचित करण्यात आले आहे.

शहरातील वेगवेगळया टुर्स, ट्रॅव्हल्स एजन्सींनी पर्यटनसाठी परदेशात जाण्या-या सर्व सहली रद्द कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातून सदयस्थितीत किती नागरिक पर्यटन किंवा इतर कारणाकरिता बाहेरगावी गेले आहेत याची माहिती घेण्यात येऊन ते नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मॉल्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, ए.पी.एम.सी. मार्केट अशा ठिकाणी नियमित स्वच्छता राहील याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

करोना व्हायरस संसर्गाच्या प्रसारास प्रतिबंध करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर शीघ्र कृती दल (Rapid Response Team) ची स्थापना करण्यात आली असून, करोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमांद्वारे नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक रुग्णालय-वाशी, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय व माता बाल रुग्णालय-बेलापूर येथे विलगीकरण (Isolation Ward) कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना स्वयंसेवा तत्वावर रुग्णालयीन सेवा पुरविणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास रुग्ण खाटा संख्येत वाढ करण्याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात आलेली आहे. गरज भासेल त्यावेळी करोना व्हायरस संसर्ग प्रतिबंध करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व स्तरावर उपायायोजना केलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे रुग्णालयीन कर्मचा-यांना याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आलेले असून, नागरिकांनी पुढील बाबींकरीता दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. 1) श्वसनसंस्थेचे आजार असणा-या व्यक्तीशी निकट सहवास टाळणे. 2) हात वारंवार धुणे व नियमित स्वच्छता ठेवणे. 3) शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपरचा वापर करणे. 4) अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. 5) फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत.
करोना व्हायरस संसर्गाकरिता आवश्यक त्या माहितीसाठी नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1800222309/2310 असून दूरध्वनी क्रमांक 022-27567270/7060 असा आहे. नागरिकांनी काही आवश्यकता भासल्यास सदर हेल्पलाईन नंबरवर संपर्क करणेबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

Share: